Breaking News

पालखी तळ परिसरात घाणीचे साम्राज्य; प्रशासनाला जाग येणार का?

The reign of filth in the Palkhi Tal area; Will the administration wake up?

    फलटण (ॲड. रोहित अहिवळे), दि. ७ जून २०२५ - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या २८ जून रोजी फलटणमध्ये येणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात तयारीला वेग आला असतानाच, पालखी तळ परिसरातील घाणीचे साम्राज्य ही मोठी चिंता ठरत आहे. नियोजनाची लगबग सुरु असताना या ठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांकडे व साचलेल्या पाण्याकडे प्रशासनाचे लक्ष जात नसल्याची नागरिकांतून तक्रार केली जात आहे.

    फलटण विमानतळाजवळ, फलटण-कुरवली रस्त्याच्या कडेला व विमानतळ परिसरात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येतो. रायगड हॉटेलजवळील मोठ्या खड्ड्यात पाणी साचून कचरा सडत असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे या परिसरात मच्छरांचा उपद्रव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    विशेष म्हणजे, या भागातच प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व इतर महत्वाची शासकीय कार्यालये असूनही परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

    नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, "पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तरी प्रशासनाला जाग येणार का?"

    प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन स्वच्छता मोहिम राबवावी, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे. अन्यथा येणाऱ्या पालखी सोहळ्यात घाणीमुळे फलटणची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

No comments