संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे फलटणमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ जून २०२५ -
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीहार गळां कांसे पितांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥ध्रु॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
टाळ, मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत सोहळा ऐतिहासिक अशा फलटणमध्ये आला. लाखो वारकऱ्यांच्या मुखातून माऊली..... माऊली.... नामाचा अखंड जागर सुरू होता. पालखी सोहळा शहराच्या वेशीवर पोहोचला. तेथे फलटण प्रांताधिकारी प्रियांका अंबेकर, उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजीत जाधव, फलटण नगर परिषदेत मुख्याधिकारी निखिल मोरे व शहरवासियांनी माऊलींसह वैष्णवांचे स्वागत केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे फलटण शहरात ५.३० वाजता आगमन झाले. पालखी सोहळा मलठण, सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक मार्गे सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिराजवळ पोहोचला. अश्वांचे व माऊलींसह वैष्णवांचे इथे नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत व दर्शन घेतले. तसेच फलटण शहरवासीयांनी माऊलींचे स्वागत केले व दर्शन घेतले. त्यानंतर सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, सफाई कामगार कॉलनी या मार्गाने विमानतळावरील प्रशस्त पालखी तळावर विसावला.
No comments