Breaking News

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे पावित्र्य राखा - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Maintain the sanctity of Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - छत्रपती संभाजी महाराज पुतळा समितीच्या माध्यमातून पुतळा परिसराची देखरेख व स्वच्छता ठेवण्यासाठी वॉचमन ठेवण्यात आला आहे तसेच स्मारक परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार इथे घडणार नाही यासाठी व्यवस्था करण्यात आली आहेच परंतु नागरिकांनीही या परिसराचे पावित्र्य राखावे असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्याचा प्रारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

    यावेळी फलटण संस्थांचे युवराज श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नितीन भोसले, सातारा जिल्हा अॅम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, उद्योजक प्रमोद अण्णा निंबाळकर, सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विशाल पवार, फलटण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, तुषार नाईक निंबाळकर, निजामभाई आतार, प्राचार्य सागर निंबाळकर, माजी प्राचार्य सुधीर इंगळे,  माजी उपनगराध्यक्ष सुनील मठपती,अनिल शिरतोडे, भाऊसाहेब कापसे, सनी शिंदे, अमरसिंह पिसाळ, विजय जाधव, विजय भोंडवे, तात्यासो तेली, पै. अभिजीत जानकर, प्रितसिंह खानविलकर, माझी प्राचार्य सुधीर अहिवळे, विकास काकडे सर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

    पुढे श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे फलटण हे आजोळ असल्यामुळे फलटणला छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे अशी सर्वच फलटणकरांची इच्छा होती.

    या भावनेतूनच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा स्मारक समिती तयार करुन या स्मारक समितीच्या माध्यमातून सदरचा पुतळा बसविण्यात आला असल्याचे सांगून श्रीमंत संजीवराजे म्हणाले म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा साम्राज्य पसरवण्यासाठी मोठे योगदान दिले असून त्यांच्या त्यागामुळेच हे सर्व शक्य झाले आहे, हे विसरता येणार नाही त्यांच्यापासून तरुणांना स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसविण्यात आला असून, या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये अशी काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे तसेच लवकरच पुतळ्या समोरील भिंत पाडून या ठिकाणी आकर्षक असे डिझाईन करण्यात येणार आहे या पुतळ्याचे संपूर्ण सुशोभीकरण करणे कामी फलटण नगर परिषदेने एक आकर्षक असा आराखडा तयार केला आहे. भविष्यात लवकरच या भागाचे चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण केले जाईल असेही शेवटी श्रीमंत संजीवराजे म्हणाले.

No comments