Breaking News

भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन - पालकमंत्री शंभूराज देसाई

 

Tricolor rally organized in Satara district on Sunday in support of Indian Army - Guardian Minister Shambhuraj Desai

    सातारा दि.10  : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

    तिरंगा रॅलीच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, शिक्षणाधिकारी माध्यमिक शबनम मुजावर आदी उपस्थित होते.

    तालुकास्तरावरील आयोजित करण्यात येणारी तिरंगा रॅली सकाळी नऊ वाजता आयोजित करावी, अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या तिरंगा रॅलीमध्ये माजी सैनिकांचा मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, त्याचबरोबर तालुक्यातील लोकप्रतिनिधींना संपर्क साधून या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करावे.उद्या दि.11 मे रोजी सकाळी नऊ वाजता भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ रॅली सकाळी नऊ वाजता निघणार आहे याबाबत जनजागृती   ॲटोरिक्षावर भोंगे लावून करावी.

    सातारा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे ही रॅली सकाळी नऊ वाजता सातारा येथील गांधी मैदान येथून सुरू होईल व पोवई नाक्यावरील  शिवतीर्थावर तिरंगा रॅलीचा समारोप होईल.

    सातारा जिल्हा हा सैन्याचा पाठीशी असल्याचे दाखवून देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री.देसाई यांनी केले.

No comments