कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे - खा. धैर्यशील मोहिते पाटील
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.8 मे - आपल्या भागावर खऱ्या अर्थाने अन्याय होऊ द्यायचा नसेल तर सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प कसा पूर्ण होईल ते पाहावे लागेल, या प्रकल्पामुळे ६ जिल्हे व २१ तालुक्यांचा पाणीप्रश्न सुटणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पामध्ये पुढाकार घेतला असून, वाहून जाणाऱ्या पुराचे पाणी आपल्या दुष्काळी भागात वाळवून सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे. यामुळे निश्चितच माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी गावे हे देखील वंचित राहणार नाहीत, त्या दृष्टीने आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
फलटण येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास नाळे यांच्यासह विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार मोहिते पाटील म्हणाले की, फलटण ते पंढरपूर या रेल्वे प्रकल्पासाठी तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी शेवटच्या रेल्वे अर्थसंकल्पामधून तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गासाठी निधी मंजूर करून घेतलेला होता. त्यामुळेच आत्ता रेल्वे प्रकल्पाला चालना मिळाली असून, याबाबत नियमित पाठपुरावा आमच्या वतीने रेल्वे बोर्डाकडे व राज्य व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे सुरू असून लवकरात लवकर प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
फलटण तालुक्यातील गोखळी येथे डॉ. शिवाजीराव गावडे यांनी त्यांच्या पाणी प्रश्नाची माहिती मला दिली, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार योग्य त्या शासनाच्या विभागाकडे नक्कीच पाठपुरावा आमच्या वतीने करण्यात येईल. यासोबतच दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी व बागायती भागाचे पाणी न जाण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील, याबाबत आपण सकारात्मक असून येणाऱ्या काळामध्ये यासाठी कार्यरत राहणार आहोत, असेही खासदार मोहिते पाटील यांनी सांगितले.
फलटण शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी आज फलटण तालुक्यातील विविध गावांमध्ये गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, राज्य सरकार व रेल्वे प्रश्नाच्या संदर्भात अनेक निवेदने प्राप्त झाली असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सुद्धा यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले.
येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्याकडून फलटण शहरासह फलटण तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही कटिबद्ध असल्याचे मत यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी व्यक्त केले.
No comments