Breaking News

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी

Father gets 10 years in prison for attempting to rape minor girl

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ मे २०२५ - स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी होळ ता. फलटण जि. सातारा येथील नराधम बाप सचिन दत्तात्रय गिरी याला फलटण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.पी. व्ही. चतुर यांनी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

    सदर खटल्याची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे-आरोपी सचिन दत्तात्रय गिरी यानी २०१९ साली त्याची अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर ती कपडे बदलत असताना तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता. सदरची हकीकत पिडीत मुलीने रडत-रडत तिच्या आईला सांगितल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली होती. तदनंतर पिडीत मुलीचा जबाब नोंदवून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस सहा. पोलीस निरीक्षक श्री.पी.पी. नागटिळक यांनी आरोपीस अटक करुन पुढील तपास करुन आरोपीविरुद्ध फलटण न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

    केसचे कामी आरोपी यांनी पत्नीने मुलीला हाताशी धरुन आपल्याविरुध्द खोटी केस केली आहे असा बचाव घेतला होता.

    केसचे कामी सरकार पक्षातर्फे एकंदरीत सहा साक्षीदार तपासणेत आले होते. पिडीतेची आई व पिडीता हिचा जबाब पाहता आरोपी यांनी गुन्हा केला असल्याचे दिसून येत आहे, तसेच त्यांची साक्ष ही विश्वासार्ह असून त्यामध्ये शंका घेण्यासारखे काहीही निष्पन्न झालेले नाही, अशा परिस्थितीत आरोपी यांनी गुन्हा केल्याचे सिध्द होत असल्याने, आरोपी यांना जास्तीत जास्त सजा देण्यात यावी, असा युक्तीवाद व जोरदार प्रतिपादन सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्री. फिरोज मिर्झासाहेब शेख यांनी केले होते.

    सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा व श्री. शेख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी सचिन दत्तात्रय गिरी याला स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व ६०००/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर केसकडे होळ पंचक्रोशीतील लोकांचे लक्ष वेधून राहीले होते. मे. न्यायालयाने अल्पवयीन मुलीला शासनाने योजनेनुसार नुकसान भरपाई द्यावी असे देखील आदेशात म्हटलेले आहे.

    सरकार पक्षातर्फे केसचे कामी विशेष सरकारी वकील श्री. फिरोज मिर्झासाहेब शेख यांनी काम चालविले. त्यांना प्रोसीक्युशन स्कॉडच्या सहकारी सौ. साधना कदम, सौ. मेघा ननवरे व श्री. अमोल घोरपडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments