सातारा जिल्ह्यात ड्रोन वापरावर बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. १७ मे २०२५ - सातारा जिल्ह्यात सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई यंत्रांच्या वापरावर जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी तात्पुरती बंदी घातली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम १६३ अंतर्गत जारी केलेल्या आदेशानुसार, ही बंदी आजपासून म्हणजेच 17 मे 2025 रोजी मध्यरात्रीपासून लागू झाली असून ती 3 जून 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही असामाजिक घटकांकडून ड्रोनच्या वापराची शक्यता असून त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जिल्ह्यातील शांततेला बाधा पोहोचू शकते. म्हणूनच तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा आदेश एकतर्फी पद्धतीने लागू करण्यात आला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सहकार्याची विनंती केली असून, सार्वजनिक सुरक्षेसाठी हा निर्णय अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
No comments