दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या २३ वर्षीय युवकाला ग्रामीण पोलिसांकडून अटक; गाडी जप्त
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. १० मे २०२५ – पालखी महामार्गावर मौजे बरड (ता. फलटण) येथे दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या एका २३ वर्षीय युवकाला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रित विलास चव्हाण (रा. माऊलीनगर, कात्रज, पुणे) असे अटकेत घेतलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्विफ्ट (MH 12 QF 1303) गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
दि.९ मे रोजी सायंकाळी ४.४७ वाजण्याच्या सुमारास जी.ओ. पेट्रोल पंपाजवळून बरड ते फलटण जाणाऱ्या मार्गावर प्रित चव्हाण हा दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. तो रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अत्यंत बेदरकारपणे व भरधाव वेगात गाडी चालवत होता. यामुळे त्याने स्वतःसह इतर नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण केला होता.
पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी केली. ब्रेथ अनलायझर टेस्टमध्ये त्याने दारू सेवन केल्याचे निष्पन्न झाले. प्रित चव्हाण याने नातेपुते पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात केल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकारामुळे महाविद्यालयीन युवकांकडून मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रमाण वाढल्याची चिंतेची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पालकांनी सतर्क राहून आपल्या मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.
No comments