पुरस्कार प्राप्त व्यक्तीने या पुढेही उमेदीने- उत्साहाने कार्यरत रहावे - ना. रामदास आठवले ; दत्ता अहिवळे - संघमित्रा अहिवळे यांचा सन्मान
![]() |
ना. रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान स्विकारताना दत्ता अहिवळे व संघमित्रा अहिवळे. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १२ : समाजाने तळहातावरील फोडाप्रमाणे जपले म्हणून आपण समाजाला न्याय देऊ शकलो याची आठवण करुन देत प्रत्येक पुरस्कार प्राप्त व्यक्तीने आयुष्यभर दिलेले योगदान महत्वाचे आहेच, पण त्याला शेकडो समाज बांधवांचे पाठबळ लाभल्यामुळे आपण पुरस्कारापर्यंत पोहचलो आहोत याची जाणीव ठेवून यापुढेही उमेदीने, उत्साहाने कार्यरत रहा असे आवाहन करताना ना. रामदास आठवले सत्कार मूर्तींच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
ट्रान्स ग्लोबल चेंबर ऑफ काॅमर्स व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सास्कृतिक महोत्सव समिती, मुंबई यांच्यावतीने पॅंथर सुवर्ण महोत्सव आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण व जीवन गौरव पुरस्कार देऊन मुंबईतील एका समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ना. आठवले बोलत होते.
ना. रामदास आठवले म्हणाले, दलित पॅंथर मध्ये लाखो तरुणांनी देहभान विसरुन समाजाला न्याय मिळावा यासाठी आंदोलने केली. हे वर्ष दलित पॅंथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. वयोपरत्वे पॅंथर थकला असला तरी अनुभवाच्या जोरावर तो विविध क्षेत्रात कार्यरत आहे. अशा अखंड व अथकपणे समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होणे आवश्यक आहे.
फलटण, जि. सातारा येथे गेल्या ४ दशकांपासून शेकडो बांधवांच्या सहकार्याने आंबेडकरी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात रचनात्मक कार्यात आघाडीवर असलेले दत्ता अहिवळे आणि संघमित्रा अहिवळे यांचा या समारंभात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देवून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था संस्थापक चंद्रकांत जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती.
No comments