चौधरवाडी खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ : दत्तनगर, चौधरवाडी येथील प्रभू टरंग्या भोसले याच्या खुन प्रकरणात व अन्य गंभीर गुन्ह्यात हवा असलेला व गेली तीन वर्षे पोलिसांना गुंगारा देत फिरणारा फरार संशयीत आरोपी इसनू अशोक भोसले रा. महादेव नगर, सस्तेवाडी ता. फलटण याच्या मुसक्या आवळण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथे दि. ९ आक्टोंबर २०२० रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या मारहाणीत प्रभू टरंग्या भोसले याचा खून झाला होता. त्याच बरोबर त्याच्या कुटूंबातील अन्य तीघेही मारहाणीत गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात दि. १० आक्टोंबर २०२० रोजी कलम ३०२ सह विविध कलमान्वये आठ जणांवर गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी इसनू अशोक भोसले हा तेव्हा पासुन पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिस त्याच्या मागावर असताना भोसले हा फलटण शहरातील सोमवारपेठेत येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिस तेथे पोहचताच त्यांची चाहुल लागल्याने भोसले याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतू पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, साताराचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि संताेष पवार, रविंद्र भाेरे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, सहाय्यक फौजदार तानाजी माने, सुधिर बनकर, पोलिस हवालदार साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, अमोल माने, पोलिस नाईक अमीत सपकाळ, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, शिवाजी भिसे, मोनाली निकम, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील दौंड, स्वप्नील माने, वैभव सावंत, मोहसिन मोमीन यांनी हि कारवाई केली.
No comments