मारहाण करून फलटण येथून एकाचे अपहरण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ : मोटरसायकल व मोबाईल घरी पोहोच कर असे धमकावत मारहाण करुन एकाचे अपहरण करून गाडीतून जबरदस्तीने घेउन गेल्याबद्दल फलटण शहर पोलिस ठाण्यात ६ इसमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सचिन मोहन काटे रा. उपळाई बुद्रुक ता. माढा, अनिल दत्तात्रय घाडगे रा. बेलवाडी ता. इंदापूर व इतर अनोळखी चार इसम अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शहर पोलिस ठाण्यात श्रीकांत हनुमंत लुंगसे वय ३५ रा. लव्हे ता. माढा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २३ एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास काकाटे गॅरेज, जिंती नाका, फलटण येथे लंगुसे यांनी पोकलेनचा भूम स्टिक दुरुस्तीस आणला होता. पोकलेनचा ऑपरेटर सचिन काटे व अनिल घाडगे व इतर आनोळखी इसमांनी सचिन काटे याची मोटार सायकल व मोबाईल घरी पोहोच कर असे लंगुसे यांना धमकावले. तसेच जोपर्यंत ती पोहोच करीत नाही, तोपर्यंत तुला सोडत नाही असे म्हणून सर्वांनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली व त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ वाहनाने बारामती मार्गे जंक्शन येथे जबरदस्तीने घेऊन गेले. आधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
No comments