Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने फलटणला अवतरली शिवशाही

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   : अखंड हिंदुस्थानचे अराध्यदैवत, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त फलटण शहरात जयभावानी, जय शिवाजीच्या घोषणांनी अवघा परिसर दणाणून सोडीत सर्वत्र भगवे वादळ निर्माण झाले होते. या भगव्या वादळात फलटण शहर अक्षरशः न्हाऊन निघाले, फलटण तालुका शिवजयंती उत्सव समिती आणि फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून छ. शिवाजी महाराज यांच्या पारंपरिक पध्दतीने काढलेल्या मिरवणूका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या, फलटण शहरात अवघी शिवशाही अवतरली असल्याचा माहोल तयार झाला होता.

गजानन चौक येथे फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या मिरवणुकीचा शुभारंभ खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करताना महिला व मुली.

    Grand procession to Phaltan on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

    छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त फलटण तालुका  सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने  शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य दिव्य १२ बलुतेदार व १८ पगड जाती एकत्र येऊन मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.

    गजानन चौकात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने ३० फुटी उंच अश्वारुढ पुतळ्यास  खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत अठरा पगड जातीमधील शिवप्रेमी व हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते क्रेनच्या सहाय्याने ५ नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. 

    शनिवार दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता  गजानन चौक येथून भव्य, दिव्य  मिरवणूक शहरातील  गजानन चौक - श्रीराम मंदीर - शंकर  मार्केट - शुक्रवार पेठ - मलठण - पाचबत्ती चौक - बारामती चौक -  या  मार्गावरुन काढण्यात आली. या मिरवणूकीत छ. शिवरायांच्या आकर्षक मूर्ती सह महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, बाजीप्रभू देशपांडे,  जिवाजी महाले यांच्या मूर्ती विविध चित्र रथावर आकर्षक विद्युत रोषणाई सह ठेवण्यात आल्या होत्या,  हनुमानाचा पेहराव परिधान केलेला जिवंत देखावा मिरवणूकीत होता,  या मिरवणूकीत घोडे  उंट आणि त्यावर शिवशाहीतील पोषाखासह घोडेस्वार व उंट स्वार, महिला झांज पथक, पुरुष झांज पथक, लेझीम पथक, हलगी पथक,  सुंबळ पथक आणि मर्दानी खेळ दांडपट्टा पथक भव्य दारुगोळ्याची आतषबाजी मिरवणूकीचे आकर्षण ठरली.

    प्रारंभी गजानन चौक येथे खा. रणजितसिंह नाईक  निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत मुली व महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणूकीचा  शुभारंभ करण्यात आला. 

मुधोजी क्लब येथे फलटण शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या मिरवणूक शुभारंभ प्रसंगी उपस्थित आ. दिपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर वगैरे
        फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीचेवतीने सकाळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी झेंडा दाखवून बाईक रॅलीला सुरुवात केली, रॅलीत ते स्वतः ही सहभागी झाले होते.  सायंकाळी ७ वाजता आ. दिपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर  यांचे उपस्थितीत मिरवणूकीला सुरुवात झाली.

    मिरवणुकीत डीजे, उंट, घोडे, ऐतिहासिक पात्रे, बैलगाडी वर नगारा,  संबळ वादक, केरळी वाद्य, महिला/पुरुष झांज पथके, तुतारी वादक आदी वाद्य वृंदांनी आणि विद्युत रोषणाई, भगवे झेंडे घेतलेले मावळे यांनी  सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 

    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिलेला प्रसंग, भक्ती शक्ती अर्थात छ. शिवाजी महाराज व तुकाराम महाराज भेट, हत्तीवरील अंबारीत छत्रपती शिवाजी महाराज, शंकर - हनुमानाचा देखावा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. 

    अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक सुरु होती. मुधोजी क्लब - महात्मा फुले चौक, जैन मंदिर - मारवाड पेठ - शंकर मार्केट - गजानन चौक - उमाजी नाईक चौक - महावीर स्तंभ या मार्गे मिरवणूक संपन्न झाली.

    अनेक वर्षापासून फलटण मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात एकत्रित साजरा केला जात होता. यावर्षी फलटण तालुका शिवजयंती उत्सव समिती व फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने दोन वेगवेगळे भव्य दिव्य असे शिवजयंती उत्सव साजरे करण्यात आले.

    कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, दोन शिवजयंती उत्सवामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात १४४ कलम (जमाव बंदी आदेश) लावण्यात आले होते, सदर चौकात दिवसभर सर्वसामान्य शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

    मिरवणूक मार्गावर  विविध चौकात मुस्लिम समाजाच्यावतीने शिवजयंती उत्सव मिरवणूकीतील नागरिकांना पाणी वाटप करण्यात आले यावरुन फलटणमधील हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा अधिक स्पष्ट झाली. 

    दोन्ही मिरवणूकांनी  शिवकालाचा अनुभव जागवला. छ. शिवरायांनी स्वराज्य उभारणीसाठी केलेले प्रयत्न त्यांना तत्कालीन मावळे व सर्वसामान्यांनी केलेली साथ, स्वराज्य स्थापना, छ. शिवरांयाचा राज्याभिषेक, शिवशाहीतील सामान्य माणसाच्या मनातील समाधानाची भावना प्रत्येकाच्या मना समोरुन तरळुन गेल्या.  फलटण शहरांसह तालुक्यातील हजारो शिवप्रेमी अबालवृद्ध मिरवणूकीत सहभागी झाले होते. प्रत्येक जण शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत होते. नतमस्तक होत होते, महिलांनीही मोठी गर्दी केली होती. पोवाडे, शिवपराक्रमांची गाणी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी शहर दुमदुमले. शोभायात्रा भव्य, दिव्य होत्या अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

No comments