Breaking News

खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश ; निरा देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता ; फलटण - पंढरपूर रेल्वे आर्थिक सहभाग देण्यास मान्यता

Success to MP Ranjitsinh's efforts ; Revised Administrative Approval for Nira Deoghar Project; Phaltan - Pandharpur Railway approved for financial participation

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१ - निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता, फलटण ते पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी दूर करण्यासंदर्भात व फलटण तालुक्यातून विद्युत रोहित्र चोरी  प्रकार गंभीर असून या संदर्भात कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.   दरम्यान झालेल्या निर्णयाचे स्वागत व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल फलटणकरांनी चौका - चौकात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
मंत्रालयात बैठकीप्रसंगी चर्चा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर  

    माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन व इतर विषयांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज  बैठक झाली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि जलसंपदा, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. 

    फलटण ते पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे या परिसरातील रेल्वे जाळे अधिक सक्षम होणार आहे. नीरा-देवघर प्रकल्पामुळे  फलटण - माळशिरस व  तालुक्यातील दुष्काळी  गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण, माळशिरस तालुक्यातील सुमारे २४,५२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

    नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरिता केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा मतदारसंघातील कामांच्या आढाव्यात दिली. 

    खा.हिंदुराव ना.निंबाळकर यांनी सुरू केलेल्या संघर्ष पुढे त्याच्या पश्चात त्याचे पुत्र खा.रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी पुढे नेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडून मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मध्ये आनंदाचे वातावरण आहे. फलटण माळशिरस भागातील शेतकऱ्यांसाठी निरा देवघर धरणातील पाणी साठ्या पैकी ११.७३ टीएमसी पाणी साठा उपलब्ध होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,शिवसेना सरकारने हे सूत्र बदलून, निरा डाव्या कालव्यातून बारामती भागाला ६० टक्के व उर्वरित फलटण माळशिरस भागाला निरा डाव्या कालव्यातून ४० टक्के पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थगिती देत, आज राज्य शासनाने उर्वरित काम पूर्ण करून लवकरात लवकर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. निरा देवघर च्या कालव्याच्या पाण्यासंदर्भात मागील माहायुती सरकारने घेतलेला निर्णय आज भाजप शिवसेना सरकारने रद्द करत, पुन्हा ३९७६ कोटीची सुधारित मान्यता देत येणाऱ्या काळात कॅनॉलचे काम पूर्ण करून फलटण माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर केला आहे.

फलटण शहरात निर्णयाचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत करताना 

    घेतलेल्या सर्व निर्णयाचे स्वागत फलटण तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी फलटण शहरात चौका - चौकात व ग्रामीण भागात प्रत्येक लाभ क्षेत्रातील गावात फटाक्यांच्या आतिषबाजीत  करत माजी खा.हिंदुराव नाईक निंबाळकर व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जयघोष केला. 

    फलटण तालुक्यातील ५६ गावे तर माळशिरस तालुक्यातील २० गावे ओलिताखाली येणार आहेत. दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी दूर करा. सांगोला उपसा जलसिंचन योजनेचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करा. फलटण-पंढरपूर रेल्वे डीपीआरला मान्यता, फलटण तालुक्यातून विद्युत रोहित्र चोरी जात असल्याचे प्रकार गंभीर असून या संदर्भात कडक कारवाई करण्याच्या पोलिसांना निर्देश दिले, कुकडी लाभक्षेत्रात येणाऱ्या करमाळा उत्तर भागातील गावांना पाणी पोहोचविण्याचे काम पूर्ण करा असे  निर्देश दिले.

No comments