Breaking News

शांतीकाका सराफ चोरी प्रकरणाला वेगळे वळण ; सुरक्षा राक्षकानेच केला होता चोरीचा बनाव

 Shantikaka Saraf theft case takes a different turn; It was the security guard who faked the theft

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ : फलटण येथे  शांतीकाका सराफ यांच्या दुकानातील सुरक्षा रक्षकास दोन अज्ञात व्यक्तींनी मारहाण करुन, गाडीच्या डिकीतून १० लाख ८० हजार रुपये लुटून नेलेल्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, संबंधित सुरक्षा रक्षकानेच हा जबरी चोरीचा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. मुलीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्याने हा प्रकार केला असलयाची कबुली दिली आहे.

        सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी येथील शांतीकाका सराफ या सोन्याच्या दुकानातील सुरक्षा रक्षक सनी हणमंत इंगळे रा. आखरी रास्ता, मंगळवार पेठ, फलटण हे दुकानचा पैशाचा भरणा करण्यासाठी जात असताना आज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना मारहाण करुन त्यांच्या गाडीच्या डिकीतील दहा लाख ८० हजार रुपयांची रक्कम लूटून नेली होती. याबाबतची फिर्याद सनी इंगळे यांनी शहर पोलिस ठाण्यात नोंदविली होती. सदर गुन्ह्याचा तपास करताना तपास अधिकाऱ्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेज, मोबाईल सीडीआर विश्लेषण केले, सीसीटिव्ही फुटेज व इंगळे यास झालेल्या जखमा व त्याच्याकडून मिळणारी विसंगत माहिती यावरुन पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. त्यानुसार इंगळे हा विसंगत माहिती देत असल्याचे व सदर गुन्हा घडल्याचा बनाव करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी कौशल्यपुर्ण तपास करुन सदर लूटीचा प्रकार हा बनाव असल्याचे निष्पन्न केले. सनी इंगळे याच्या मुलीस कॅन्सर असुन त्याच्या उपचारासाठी त्याला पैशाची आवश्यकता होती, म्हणुन त्याने हा मारहाणीचा व लूटीचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास अटक केली असुन त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी आठ लाख २० हजार रुपये जप्त केले आहेत. 

        सदर तपास पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड व सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला.

No comments