Breaking News

जादूटोण्याचा प्रकार आढळल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधा - सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे

If you find any kind of black magic, contact the police immediately - Assistant Commissioner Nitin Ubale

    सातारा दि. 24 : आपल्या आसपास कुठेही अमानुष, अघोरी प्रथा, जादुटोण्याचे प्रकार अथवा नरबळीसारख्या गंभीर घटनांचा संशय आल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा नितीन उबाळे यांनी केले आहे.

    भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोराने अथवा साखळीने बांधून मारहाण करणे, त्या व्यक्तीला छताला टांगणे, काठीने अथवा चाबकाने मारणे, मिरचीची धुरी देणे,  शरीरावर किंवा अवयवावर तापलेल्या वस्तूचे चटके देवून इजा पोहोचविणे आदी अघोरी कृती करणे, तसेच नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांचा प्रचार करणे किंवा ते प्रसिद्ध करणे अशा अपराधांसाठी दोषी असलेली व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर 6 महिने कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच 7 वर्षे कारावास व 50 हजार रुपये दंड असून हा अपराध  दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील, अशी तरतूद महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतच्या अधिनियमामध्ये करण्यात आलेली आहे.

    तसेच एखाद्या व्यक्तीचे बाबतीत अपराध घडल्यास अथवा निदर्शनास आल्यास यासंदर्भातील गुन्हा नोंदविण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये दक्षता अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हे दक्षता अधिकारी असतील. त्यांना स्वत: तक्रार दाखल करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

   समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट, अमानुष आणि अघोरी प्रथा, जादुटोण्याचे प्रकार, नरबळी आदींबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जागरुकता निर्माण करण्याचे काम केले जाते. समाजातील अज्ञानामधून निर्माण झालेल्या गैरसमजूतींमुळे सरतेशेवटी समाजाचेच नुकसान होते. जादूटोणा, अनिष्ट प्रथांचे प्रकार आपल्या आसपास आढळून आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा श्री. नितीन उबाळे यांनी केले.

No comments