Breaking News

फलटणच्या जनतेला उत्तम - गतिमान खेळ पहावयास मिळणार आहे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ; फलटण येथे राष्ट्रीय किशोर व किशोरी खो - खो स्पर्धेचा शुभारंभ

Inauguration of National Kishor and Kishori Kho-Kho Competition at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. २९ - आपल्या देशाचे व खो - खो खेळाचे भविष्य असणारी ही मुलं, देशाच्या कानाकोपऱ्यातून फलटणला आली असून, फलटणच्या जनतेला या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने उत्तम - गतिमान खेळ पहावयास मिळणार असल्याचे सांगून, फलटण नगरीत सर्व खेळाडूंचे स्वागत विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.  

मशाल पेटवून राष्ट्रीय खो - खो स्पर्धेचा शुभारंभ करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अभिमन्यू पवार (छाया - योगायोग फोटो)

        खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या राष्ट्रीय किशोर व किशोरी खो - खो स्पर्धा २०२२ चा शुभारंभ श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते करण्यात आला.  याप्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिकेत तटकरे, महाराष्ट्र खो - खो असोसिशनचे उपाध्यक्ष व आमदार अभिमन्यू पवार, आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो - खो असोसिशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो - खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजित जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयराव मोरे, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा, महाराष्ट्र खो खो असोसिशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, भारतीय खो - खो संघाच्या कर्णधार सुप्रिया गाढवे,कब्बडी खेळाडू पंकज शिरसाट, फलटणचे तहसीलदार समीर यादव, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड व सातारा जिल्हा खो खो असोसिएनचे सर्व पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय खो - खो स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर  व शेजारी व्यासपिठावर अन्य मान्यवर

     मागील दहा दिवसांपूर्वी फलटण येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस होता.  खो-खो स्पर्धेवर पावसाचे सावट होते. त्यामुळे माझ्यासह श्रीमंत संजीवराजे यांना स्पर्धा नक्की कश्या पार पडतील या बाबत साशंकता होती. परंतु पावसाने विश्रांती दिल्याने फलटणला संपन्न होणाऱ्या खो - खो स्पर्धा यशस्वी होतील, असा विश्वास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी खेळाडूंना शुभेछा देताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

      फलटण येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक राज्याच्या संघांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. सदर रक्कम पंधरा दिवसात संघांच्या बँक खात्यात जमा होईल अशी विशेष घोषणा करुन, देशात खो-खो खेळास प्रतिसाद वाढत आहे. महाराष्ट्राने अनेक गुणी खेळाडू या खेळास दिले आहे. महाराष्ट्राची खो-खो खेळातील कामगिरी पाहता, खो-खो वर्ल्ड चॅम्पियन लिगच्या स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या स्पर्धेत सुमारे बत्तीस देशातील संघांचा सहभाग राहील असे भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंह त्यागी यांनी यावेळी सांगितले.

    फलटणला स्वतःचा व खो - खोचा असा इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये खो - खो सह सर्वच खेळांना प्रोत्साहन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासह मान्यवरांनी काम केले आहे. श्रीमंत संजीवराजे यांच्या नेतत्वाखाली राज्यात खो - खो मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशात खेलो इंडियाची वाढ मोठ्या प्रमाणात सर्वच तालुक्यात आहे. धाराशिव येथे होणाऱ्या पुढील राष्ट्रीय खो - खो सामन्यासाठी सर्वांना येथूनच मी निमंत्रण देत आहे, असे मत महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे उपाध्यक्ष व औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.

    महाराष्ट्रात कोणत्याही खेळाचे आयोजन करण्यात येते ते एकदम भव्य दिव्य आयोजन करण्यात येते. फलटण ही खो - खो ची पंढरी आहे. फलटणला खो - खोचे जे सामने आयोजित केले जातात त्याचे नियोजन  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्ट  केले जाते. स्व. पी. जी. शिंदे यांची मोठी उणीव आज जाणवत आहे. ते फलटणच्या राज घराण्याशी एकनिष्ठ होते. क्रिकेट नंतर खो - खो खेळ हा मोठा लोकप्रिय खेळ आहे. खो - खो खेळ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाला जाण्यासाठी आपण सर्व जण कार्यरत आहोत. आगामी काळात त्याला नक्कीच यश येईल, असे मत भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय खो - खो स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना महाराष्ट्र खो - खो असोसिशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    फलटणला खो - खो ची मोठी परंपरा आहे. फलटणला खो - खोची पंढरी म्हणाले तर वावगे ठरणार नाही. फलटणला सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त असा खो खोचा इतिहास आहे. फलटणला विविध खेळांची परंपरा आहे. फलटणला खो खो सोबत, हॉकी, आर्चरी, कुस्ती सह विविध खेळांची फलटणला परंपरा आहे. २४ राज्यातून फलटणला संघ आलेले आहे. २४ किशोर व २४ किशोरी असे मिळून एकूण सुमारे ६५० हून अधिक खेळाडू फलटणमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्रातील खो खो ला खासदार शरद पवार व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे नेहमीच सहकार्य असते. नुकत्याच खो खोच्या आयपीएल सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खो खोला एक वेगळे प्रवेशद्वार उघडले आहे. खो खो खेळाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम खेळाडू करतील असा मला विश्वास आहे, असे मत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

शुभारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम 

    स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व राज्यातील टीमने मार्च पास काढत खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर मशाल पेटवून सामन्यांचा प्रारंभ करण्यात आला.फलटणची ओळख असलेल्या फलटण दर्शन या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम संपन्न झाल्यावर फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

खो - खो राष्ट्रीय खेळाडू कु. प्रियंका येळे हिचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान (छाया - योगायोग फोटो)

    किशोर व किशोरी गटातील देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूस दिला जाणारा २००९ सालचा वीरबाला पुरस्कार, अखिल भारतीय पातळीवरील कुमार व कुमारी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूस दिला जाणारा २०११ सालचा जानकी पुरस्कार व राष्ट्रीय पातळीवरील  पुरुष व महिला गटातील २०१२ सालचा मानाचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळविणारी फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील असणारी कु. प्रियंका येळे ही भारतातील एकमेव खो-खो खेळाडू आहे. तीचा व कब्बडीमध्ये तेरा सुवर्णपदके मिळविणारे अर्जून पुरस्कार प्राप्त पुणे येथील सहाय्यक पोलिस आयुक्त पंकज शिरसाट यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

No comments