Breaking News

तणाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळाला महत्त्व द्यावे : श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर

श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करताना श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर शेजारी मान्यवर. (छाया : योगायोग फोटो, फलटण)

Students should give importance to sports to reduce stress - Shrimant Satyajitraje Naik Nimbalkar

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   : अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनावर येणारे ताण तणाव दूर करुन भविष्यातील उज्वल यश संपादन करण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळासाठी वेळ दिला पाहिजे,  विद्यार्थी दशेत कोणता ना कोणता खेळ विद्यार्थ्यांनी खेळायलाच हवा, असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

    मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे कनिष्ठ विभागात शिकत असणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धा २०२२ चे उदघाटन श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले, त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे होते.

    जिद्द व चिकाटी या गुणांमुळे खेळाडू नक्की यशस्वी होतात, त्यासाठी खेळाडूंनी हे गुण वाढवण्यावर भर द्यावा,  सध्या विद्यार्थी करिअर म्हणून खेळाकडे पहात आहेत, तसेच खेळातील सहभागाला मार्क्स मिळत असल्यामुळे विद्यार्थी खेळाकडे आकृष्ट होत असल्याचे शिवाजीराव घोरपडे यांनी अध्यक्षीय भाषणात आवर्जून सांगितले.

    मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू, पंच तसेच मान्यवरांचा रोपे देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालय कनिष्ठ विभाग सर्व स्टाफ,  शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    प्रारंभी महाविद्यालय कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा. एस. आर. वेदपाठक यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी हे स्वतः उत्कृष्ट खेळाडू व क्रीडाप्रेमी असल्यामुळे या स्पर्धा भरविताना पंखामध्ये बळ आल्याचा आवर्जून उल्लेख केला. 

    कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सौ. निलम देशमुख यांनी, प्रा. दिलीप शिंदे यांनी समारोप व आभार मानले. कनिष्ठ विभाग जिमखाना प्रमुख प्रा. टी. एम. शेंडगे यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले होते.

No comments