Breaking News

भैरोबागल्ली फलटण येथे घरफोडी ; सोन्या- चांदीचे दागिने व रोकड लंपास

Burglary at Bhairobagalli Phaltan; Gold- Silver jewelery and cash stolen

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ जून -  भैरोबागल्ली, बुधवार पेठ, फलटण येथील  घराला लावलेले कुलुप कापुन, घरातील ६२ हजार ९०० रुपये किंमतीचे  सोन्या व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी अज्ञाता विरोधात  घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अधिक माहिती अशी की, अभिषेक अविनाश कुमठेकर मूळ रा.गोखळी ता. फलटण हे श्रीराम सहकारी साखर कारखान्यात नोकरीस असून सध्या ते भैरोबा गल्ली बुधवार पेठ फलटण येथे राहण्यास आहेत. दिनांक २५ मे २०२२ रोजी कुमठेकर हे भैरोबा गल्ली येथील घराला कुलूप लावून, आपल्या कुटुंबासमवेत शेतीच्या कामासाठी गावी गेले होते. दुसऱ्या दिवशी शेजारी यांनी फोन करून घराचे दार उघडे असल्याबाबत सांगितल्यानंतर, कुमठेकर घरी आले असता, घराला लावलेले कुलुप कोणीतरी कशाच्या तरी सहाय्याने कोयंड्यातुन कापुन तुळशीच्या झाडात टाकलेले दिसले. कुमठेकर यांनी घरात जावुन पाहिले असता, घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व किचनमध्ये असले गोदरेजचे लोखंडी कपाटाचे दोन्ही दरवाजे व लॉकर देखील उघडे होते. या घरफोडी मध्ये अज्ञात चोरट्याने, ३२ हजार रुपये किंमतीच्या १३ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३ हजार रुपये किंमतीच्या १.२८ ग्रॅम वजनाचा सोन्याच्या डुलांचा जोड, ५ हजार रुपये किंमतीच्या २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम, १५ हजार रुपये किंमतीची ६ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची चैन, १  हजार रुपये किंमतीचा ३० ग्रॅम वजनाचा चांदीचा पैंजण जोड,  ८०० रुपये किंमतीचा २० ग्रॅम वजनाचा चांदीचे तोडे, १ हजार ८०० रुपये किंमतीचे ५० ग्रॅम वजनाचा चांदीचे ब्रेसलेट,  ८०० रुपये किंमतीचा ३० ग्रॅम वजनाचा चांदीचा कमरपट्टा व ३५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ६२ हजार ९०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची फिर्याद अभिषेक अविनाश कुमठेकर यांनी दिली आहे.

No comments