Breaking News

फलटण येथील कुटुंबावर सामाजिक बहिष्कार : बोकडाची मुंडी व कातडे डोक्यावर घेवुन, उघडया अंगाने धिंड व पंच कमिटीची थुंकी चाटून, नाक घासुन पाया पडण्याची घातली अट

Social exclusion of family in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ मे   - तुम्हाला जातीत यायचे असेल, तर तुमच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी लाख रुपये दंड व ११ बोकडे गावात येवुन कापावी लागतील व त्याची मुंडी व कातडे डोक्यावर घेवुन, उघडया अंगाने धिंड काढावी लागेल व गावातील पंच कमिटीची थुंकी चाटावी लागेल, तसेच नाक घासुन पाया पडावे लागेल तरच तुम्हाला आम्ही समाजात पुन्हा मिसळुन घेऊ, अशा जाचक अटी टाकून मलठण, फलटण येथील भोरे कुटुंबाला जात पंचायतीने वाळीत टाकल्या प्रकरणी, २० जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी, अजित लक्ष्मण भोरे रा. सगुणामाता नगर, संतोषीमाता मंदिराशेजारी मलठण, फलटण ता. फलटण जि. सातारा मुळ गाव उडगी ता. अक्कलकोट जि.सोलापुर हे त्यांच्या नातेवाईकांसह   सगुणामाता नगर, संतोषीमाता मंदिराशेजारी मलठण, फलटण  येथे राहतात,  अजित भोरे यांच्या मुळ गावी अजुनही गोंधळी जात पंचायत परंपरा चालु असुन, त्या ठिकाणी यात्रेच्या वेळी समाजातील लोकांच्याकडुन फंड रोख रक्कम स्वरुपात गोळा केला जातो व ज्या लोकांना पैशाची गरज आहे, त्यांना सदर फंडातील पैसे ३ टक्के व्याजाने दिले जातात. त्यानंतर पुढच्या वर्षी यात्रेला सदर फंडातील रक्कम व त्यावरील व्याज रोख स्वरुपात भरून घेतले जाते. ज्या लोकांची परस्थिती नाही अशा लोकांना दिवसाला १ हजार रुपये दंड आकारला जातो, तसेच फंडातील रक्कम घेतल्यानंतर त्या रकमेला दोन जामिनदार घेतले जातात, फंडातील रक्कम भरली नाहीतर सदरची रक्कम जामीनदार यांचेकडुन जबरदस्तीने भरून घेतली जाते. सदरची रक्कम व त्यावरील व्याज भरले नाही तर त्या कुटुंबास वाळीत टाकले जाते.

    जानेवारी २०२० मध्ये अजित लक्ष्मण भोरे यांची मेव्हणी चांदणी विनायक उगाडे रा. कुरबावी ता. माळशिरस जि. सोलापुर हीचा साखरपुडा असल्याने त्याठिकाणी अजित लक्ष्मण भोरे, महेश रजणिकांत भोरे,  स्वाहानंद रजणिकांत भोरे व राहुल मारुती भोरे असे गेलो होते. कार्यक्रम चालू असताना अजित लक्ष्मण भोरे व  समाजातील प्रमुख व्यक्ती टिळा लावणारे १) सिद्धराम शंकर उगाडे  २) औदुंबर बाळु उगाडे, ३) विनायक बबन उगाडे ४) हणमंत शंकर उगाडे असे एकत्रीत बसले असता,  अजित लक्ष्मण भोरे व त्यांच्या बरोबर गेलेले लोक यांनी, फंडाची व वाळीत टाकण्याची पद्धत बंद करा असे त्यांना सांगितले, त्यावेळी टिळा लावणारे सिद्धराम शंकर उगाडे यांनी त्यांच्या मुळ गाव उडगी ता. अक्कलकोट जि. सोलापुर येथील अमर प्रभु मोरे (पाटील) यांना फोन करुन सांगितले की, अजित भोरे सदरची प्रथा बंद करा असे म्हणत आहे. त्यावेळी त्यांनी अजित भोरे व त्यांच्या समवेत असणाऱ्या लोकांना टीळा लावला नाही व मान - पान दिला नाही. तुम्हाला समाजातून बाहेर काढु तसेच तुम्ही आमच्या समाजात यायचे नाही, कोणत्याही कार्यक्रमात यायचे नाही, तुम्हाला वाळीत टाकले आहे असे म्हणून अजित भोरे व त्यांच्या बरोबर आलेल्या  लोकांना हाकलून दिले.

    त्यानंतर दि. २७/१२/२०२१ रोजी अजित भोरे यांच्या समाजातील मलटण, फलटण येथील राहणारे शंकर माने यांच्या मुलीचे लग्न शिंदेवाडी ता. फलटण येथे असल्याने, त्या लग्नास उडगी येथुन अमर प्रभु भोरे, शिवाजी अंबाजी भोरे, विजय लक्ष्मण भोरे, विठ्ठल काशीनाथ वाघमारे, औंदुबर बाळु उगाडे, जालिंदर अकुश माने, लखन परमेश्वर माने, हणमंत शंकर उगाडे, विनायक बबन उगाडे, दिंगबर दतात्रय भोरे व आणखी सहा ते सात जण लग्नास आले होते. त्यावेळी त्या लग्नास अजित भोरे व कुटुंबियांना बोलविले नव्हते. लग्न झालेनंतर ते सर्वजण, अजित भोरे यांच्या घरी मलठण, फलटण येथे आले व अजित भोरे व कुटुंबाला म्हणाले, 'तुम्हाला जातीत यायचे असेल तर, तुमच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी लाख रुपये दंड व ११ बोकडे गावात येवुन कापावी लागतील व त्याची मुंडी व कातडे डोक्यावर घेवुन, उघडया अंगाने धिंड काढावी लागेल व गावातील पंच कमिटीची थुंकी चाटावी लागेल, तसेच नाक घासुन पाया पडावे लागेल, तरच तुम्हाला आम्ही समाजात पुन्हा मिसळुन घेऊ. त्यावर अजित भोरे व कुटुंबीय यांनी, आलेल्या सर्वांना विनंती केली की, जातपंचायत बंद करा व फंडाचे पैसे सर्व लोकाना समान वाटुन फंड बंद करा असे म्हणाल्या नंतर ते सर्व लोक ज्याचे त्याच्या घरी निघुन गेले.

     त्यानंतर अजित भोरे व कुटुंबीय यांनी डीवायएसपी ऑफीस फलटण येथे तक्रारी अर्ज केला. सदर अर्जाचे चौकशीकामी अजित भोरे व कुटुंबीय व वरील सर्व लोकांना बोलावुन घेतले, तेथे  सर्व प्रथा बंद करणेबाबत त्यांनी मान्य केले व तेथुन ते सर्व लोक निघुन गेले.

     त्यानंतर दि. २१/३/२०२२ रोजी अजित भोरे हे त्यांच्या मुळ गावी पिराचा उरूस असल्याने लक्ष्मण विठ्ठल भोरे, अजित लक्ष्मण भोर, रजणिकांत अंबादास भोरे, महेश रजणिकांत भोरे असे एकत्रितपणे गेले. त्यावेळी  त्यांच्या समाजातील १) अमर प्रभु भोरे २) शिवाजी अंबाजी भोरे ३) विजय लक्ष्मण भोरे, ४) बाबासाहब उत्तम भोरे, ५) शहाजी तानाजी भोरे, ६) सचिन मधुकर भोरे ७) संजय तुळशीराम भोरे, ८) नामदेव श्रीरंग भोरे ९) पप्पु मधुकर भोरे सर्व रा. उड़गी ता. अक्कलकोट जि. सोलापुर १०) जालिंदर अकुंश माने रा. लोणंद ता. खंडाळा जि. सातारा, ११) लखन परमेश्वर माने रा.बेगमपुर ता. मंगळवेढा जि. सोलापुर. १२) हणमंत शंकर उगाडे १३)  विश्वास सिताराम उगाडे १४) सिद्धराम शंकर उगाड़े तिन्ही रा. तांबवे ता. माळशिरस जि.सोलापुर, १५) विनायक बबन उगाडे रा. कुरबावी ता. माळशिरस जि. सोलापुर १६) दिंगबर दतात्रय भोरे रा. मलठण फलटण १७) अशोक भानुदास माने मंगळवेढा ता. मंगळवेढा  १८) औंदुबर बाळू उगाडे रा. नातेपुते ता.माळशिरस जि. सोलापुर १९ ) विठ्ठल काशीनाथ वाघमारे २०) काशिनाथ विठ्ठल वाघमारे दोन्ही रा. म्हसवड ता. माण जि. सातारा यांनी  अजित भोरे व इतर लोकांना, पुन्हा शिवीगाळ दमदाटी करून, तुम्हाला आम्ही अदयाप पर्यंत समाजात घेतलेले नाही. तुम्ही आम्हाला फलटण येथे बोलावले, त्याला आमचा साडे चार लाख रुपये खर्च झालेला आहे. तो तुम्हाला द्यावा लागेल व ११ बोकडे दयावी लागतील असे म्हणाले, म्हणुन अजित भोरे यांनी त्यांना विरोध केला असता, अमर प्रभु भोरे, बाबासाहब उत्तम भोरे, शहाजी तानाजी भोरे, शिवाजी अंबाजी मोरे यांनी बेकायदा जमाव जमवुन अजित भोरे व महेश भोरे यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद अजित लक्ष्मण भोरे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली असून, त्या अनुषंगाने २० जणांच्या विरोधात आयपीसी व सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध, प्रतिबंध व निवारण) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments