रेल्वेत नोकरीला लावतो म्हणून ८ लाख रुपयांची फसवणूक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महतपुरा पेठ, फलटण येथील युवकास रेल्वे खात्यात नोकरी लावतो म्हणून ८ लाख रूपये घेऊन, प्रत्यक्षात नोकरी न लावता त्याऐवजी रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र देवून, फसवणूक केल्या प्रकरणी पाटण जि. सातारा येथील शिवाजी माने व मलकापूर ता. कराड येथील अनिल कचरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, श्रीमती उज्वला नायाजी जाधव रा.महतपुरा पेठ काळुबाई नगर मलठण फलटण ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजी बबनराव माने रा.चापोली रोड पाटण ता. पाटण जि. सातारा व अनिल दत्तात्रय कचरे रा. मलकापुर ता. कराड जि. सातारा यांनी माझे पतीशी गोड बोलून, माझा मोठा मुलगा हेमंत नायाजी जाधव यास रेल्वेत नोकरी लावतो, त्यासाठी ८ लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर माझे पती यानी दि. १७/१०/२०१९ रोजी शिवाजी माने यांचे बँक खात्यावर आर. टी. जी. एस द्वारे ४ लाख रुपये पाठविले, त्यानंतर माझे पती यांनी फोन केल्यानंतर, आठ दिवसानी बोलावतो असे म्हणुन दोन महिने फसविले व दोन महिन्यांनी श्री अनिल कचरे याचा फोन नंबर दिला. अनिल कचरे यांना माझ्या पतीने फोन केला, तेव्हा ते म्हणाले की मला दोन लाख रुपये पाठवा तुमच्या मुलाचे मी रेल्वेत काम करतो, त्यानंतर त्यांना दि. ४/१/२०२० रोजी २ लाख रुपये आर टी जी एस द्वारे पाठविले. त्यानंतर सेंट्रल रेल्वे मुंबई डीव्हीजन असे इंग्रजीत नाव असलेले बनावट नियुक्तीचे पत्र दिले. त्याबाबत आम्ही फोन केला तेव्हा अनिल कचरे बोलले की, तुमचे काम करीत आहे, मुलाचे सर्व शैक्षणिक कागदपत्र पाठवा आणि रिपोटींगसाठी आणखी दोन लाख रुपये पाठवा, म्हणुन माझे पती यांनी आणखी २ लाख रुपये दि. १७/१/२०२२ रोजी अनिल कचरे यांच्या खात्यावर आर. टी. जी. एस. द्वारे पाठविले. नंतर आम्ही वेळोवेळी कामाबाबत फोन केले असता, आता लॉकडाऊन आहे. रेल्वे सुरु नाही वेळ लागेल असे बोलून, आम्हाला फसवत गेले, त्यानंतर माझे पतीचे कोरोना मुळे निधन झाले. नंतरही आम्ही शिवाजी बबनराव माने अनिल दतात्रय कचरे यांना फोनद्वारे नोकरीबाबत बोलत होतो, परंतु ते उडवीउडवीची उत्तरे देत आहेत. तरी शिवाजी माने व अनिल कचरे या दोघांनी मिळून माझा विश्वास संपादन करून माझ्या मुलास रेल्वेत नोकरी लावतो म्हणून रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र देवून, माझी रक्कम रुपये ८ लाख घेवून मुलास नौकरीस न लावता माझे मयत पती व माझी फसवणुक केली असल्याची फिर्याद दिली आहे.
No comments