आदर्श शोध पत्रिकारिता पुरस्काराने दीपक प्रभावळकर सन्मानित
![]() |
मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श शोध पत्रकार पुरस्कार प्रकाश बाळ जोशी यांच्या हस्ते स्वीकारताना दीपक प्रभावळकर सोबत एस.एम.देशमुख, पंढरीनाथ सावंत व इतर |
मुंबई (प्रतिनिधी) - गेल्या 24 वर्षात ज्या तडफेने आणि शोधक वृत्तीने केलेल्या पत्रकारितेची दखल मराठी पत्रकार परिषदेने घेऊन ‘तरुण भारत'चे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांना सन्मानित करण्यात आले. प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार प्रभावळकर यांना विरार येथील विवा कॉलेजमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळय़ात गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल सातारा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, दीपक शिंदे, राजेश सोळस्कर, सुजित आंबेकर, यांनी प्रभावळकर यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, यावेळी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. याचबरोबर राज्यात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या संपादक नीलेश खरे, मृणालिनी नानिवडेकर, अच्युत पाटील, भारत रांजणकर, राजेंद्र काळे, उत्तम दगडू, दीपक कैतके या पत्रकारानांही मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पुरस्काराने गौरवण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार प्रकाश बाळ जोशी हे उपस्थित होते. तसेच पुरस्कार वितरण सोहळय़ाला आमदार हितेंद्र ठाकूर, शरद पाबळे, राजा आदाटे, संजीव जोशी, विजय जोशी, गजानन नाईक, अनिल महाजन यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी दीपक प्रभावळकर म्हणाले, माझा पिंड पत्रकारितेचा नव्हता. सुरुवातीला सिमेंन्समध्ये नोकरी करत असताना या क्षेत्रात अनावधानाने आला. आलोच आहे या क्षेत्रात तर पूर्ण क्षमतेने करायचे असे ठरवले आणि गेली 24 वर्षे हे करत आलो आहे. नुकतीच आलेली कोरोना महामारीने संपूर्ण जगात हडकंप माजला. प्रशासनाने व शासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहून जगरहाटी सुरू होती. पण पत्रकाराने यामध्ये शोधक वृत्तीने आरोग्य यंत्रणेमध्ये सुरू असलेला गोंधळ मांडायला हवा होता. "तरुण भारत"ने अचूक बातमीच्या माध्यमातानू अनेक घोटाळे बाहेर काढले. वास्तविक अशा प्रकारच्या कार्याची सर्वच पत्रकारांकडून समाजाला अपेक्षित असते. हरवलेली पर्स सापडली एवढय़ा बातमीपुरती पत्रकारिता त्याची सिमीत असायला नको तर समाजात चालणाऱया घडामोडीकडे शोधक नजरेतून पाहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी म्हणाले, पत्रकाराने आपल्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. पिंट मीडिया, व्हिज्युएल किंवा सोशल मीडिया यापुरते मर्यादित न राहता त्याने इतर कलागुणांना वाव दिला पाहिजे.
सोहळय़ाचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख म्हणाले, पत्रकार हा प्रभावळकरांसारखा असायला हवा. कोरोनाच्या महामारीत अनेकजणांचे काम घरातूनच सुरू होते. पण कायम धडपडी स्वभावाच्या प्रभावळकरांनी शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले. चुकीचे मेडिकेशन, आरोग्य विभागाचा अपलोड घोटाळा यासह विविध घटनांवर बारकाईने निरीक्षण नोंदवत ‘तरुण भारत'च्या माध्यमातून आवाज उठवला. याची दखल प्रशासन व शासनाला घ्यावी लागली. याबाबतचे "कोविडायन : डायरी ऑफ पेंडॅमिक" हे अप्रतिम पुस्तकही त्यांनी लिहले आहे. तसेच देशमुख यांनी शासनस्तराबरोबरच सर्वच पातळय़ांवर पत्रकारांची उपेक्षा सुरू आहे. त्यामुळे सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन लढा उभारायची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी पुरस्कारप्राप्त पत्रकारांनीही मनोगते व्यक्त केली. आभार मराठी पत्रकार परिषदेच्या महिला संघटक जान्हवी पाटील यांनी आभार मानले.
No comments