Breaking News

वीजचोरी रोखणाऱ्या अभियंत्याला मारहाण ; सहा. फौजदारावर गुन्हा

Beating of engineer who prevented power theft 

    सातारा – हॉटेलची वीजचोरी रोखण्यास गेलेल्या सहाय्यक अभियंत्याच्या अंगावर धावून जात हात-पाय तेाडून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या हॉटेल मालक तथा वरळी येथे सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत असणाऱ्या आरोपीवर महावितरणने वीजचोरी व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

     याबाबत घटनेची हकीकत अशी की, महावितरण गिरवी (ता. फलटण) शाखेचे सहा. अभियंता श्री. भरत भोसले हे मंगळवारी (दि.3) दुपारी गिरवी येथील हॉटेल निशांतची वीजचोरी पकडण्यासाठी सहकाऱ्यासह गेले होते. या हॉटेलसाठी विजेच्या तारेवर आकडा टाकून वीजचोरी सुरु होती. अभियंता भोसले यांनी आकडा काढून पुढील कारवाईसाठी शाखा कार्यालयाकडे जात असताना हॉटेल मालक दीपक सोपान निकाळजे तिथे आले. भोसले यांची गाडी अडवून त्यांना गाडीबाहेर खेचून आकडा का पकडला म्हणून शिवीगाळ सुरु केली. ‘तू गिरवीत पाय ठेवून दाखव, तुझे हात-पाय तोडेल. तुला जिवंत ठेवणार नाही’ असे म्हणत धक्काबुकी व दमदाटी केली. अभियंता भोसले यांनी वीजचोरी पकडणे माझे काम आहे असे वारंवार सांगत होते परंतु आरोपीने काहीएक ऐकले नाही.

    सदर आरोपी दीपक निकाळजे हा वरळी पोलीस ठाण्यात सहा. फौजदार पदावर कार्यरत असल्याचे समजते. कायद्याच्या रक्षकाकडूनच वीजचोरीचा गुन्हा होत असल्याने व ते रोखण्यास गेल्यास अटकाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भोसले यांच्या फिर्यादीनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात 1279 युनीट वीजचोरी केल्याप्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार तर शासकीय कामात अडथळा व धमकावणे कामी भादंवि कलम 353, 504, 506, 507 अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तसेच वीजचोरीपोटी 19094 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

वीजचोरी करणाऱ्यांची गय नाही
वीजचोरी करणाऱ्यावर महावितरण वेळोवेळी कठोर कारवाई करते. दंड लावते. वीजचोर कोणी का असेना, त्याची गय केली जाणार नाही.
गौतम गायकवाड,
अधीक्षक अभियंता, महावितरण, सातारा

No comments