संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पहिल्याच बैठकीत २२० प्रकरणे मंजूर - बापूराव गावडे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : नवनियुक्त संजय गांधी निराधार व अनुदान योजना समितीच्या पहिल्याच बैठकीत २४० पैकी २२० प्रकरणे मंजूर करण्यात आली असून कागद पत्रांच्या पूर्ततेअभावी उर्वरित २० प्रकरणे नामंजूर करण्यात आल्याची माहिती समितीचे नवनियुक्त अध्यक्ष बापूराव दत्तात्रय गावडे, खटकेवस्ती यांनी दिली आहे.
नवनियुक्त संजय गांधी निराधार व अनुदान योजना समितीची बैठक तहसील कार्यालय, फलटण येथे नुकतीच संपन्न झाली, अध्यक्षस्थानी नवनियुक्त अध्यक्ष बापूराव गावडे होते. समितीचे सदस्य भारत माधव अहिवळे फलटण, अवंतिका विक्रमसिंह जाधव हणमंतवाडी, विकास राजाराम नाळे मठाचीवाडी, सदाशिव बाबुराव जगदाळे फलटण, प्रतापसिंह सुभाषराव निंबाळकर फलटण, दत्तात्रय कांतीलाल गुंजवटे सोमंथळी, ज्ञानेश्वर रमेश पवार वाघोशी, अर्जुन कोंडीबा रुपनवर कोळकी तसेच गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड, आणि सदस्य सचिव तथा तहसीलदार समीर मोहन यादव बैठकीस उपस्थित होते.
![]() |
संजय गांधी निराधार व अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बापूराव गावडे यांचे स्वागत करताना तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे, मुख्याधिकारी संजय गायकवाड व इतर |
प्रशासनाच्यावतीने समिती अध्यक्ष व सदस्यांचे यथोचित स्वागत केल्यानंतर तहसीलदार तथा सदस्य सचिव समीर यादव यांनी समितीचे कामकाज, लाभार्थी निवड, आतापर्यंत निवडण्यात आलेली लाभार्थी संख्या याविषयी सविस्तर विवेचन केले. त्यानंतर आलेल्या अर्जावर चर्चा करुन पात्र लाभार्थींची निवड करण्यात आली.
या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना १४९, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना ४६, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना १८, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ७ असे एकूण २२० अर्ज मंजूर करण्यात आले. या प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा एक हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे समिती अध्यक्ष बापूराव गावडे यांनी बैठकीनंतर सांगितले.
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या माध्यमातून तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना ३३६७, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना ३१९३, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना १७५८, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ३०८, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना १५ अशा एकूण ८ हजार ६४१ लाभार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे दरमहा ८६ लाख ४१ हजार रुपये तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत २८ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये दिले जात असल्याचे नव नियुक्त अध्यक्ष बापूराव गावडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
No comments