Breaking News

आंदोलन नव्हतेच 'तो' हल्ला होता; राजकीय बदल हवा असणाऱ्या मंडळींचा हा उद्योग - सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

It was not a movement, it was an attack -Shrimant Ramraje Naik Nimbalkar

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ एप्रिल - घरासमोर जाऊन आंदोलन करणे हे कोणत्या लोकशाहीत बसतं ? हे समजत नाहीये आणि हे आंदोलन नव्हतेच, हा तर हल्ला होता! सिल्वर ओक समोर आंदोलकांनी आंदोलन केले नाही तर हल्ला केला होता, राजकीय बदल हवा असणाऱ्या मंडळींचे हे उद्योग असून, राज्यात  सत्ता बदलासाठी  प्रयत्नशील असलेल्या मंडळींनी केवळ राजकीय हेतुने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर हल्ला घडवून आणून, राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. या प्रयत्नाद्वारे त्यांना महाराष्ट्र सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट आणून सत्ता बदलाची घाई झाल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

        खा. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करीत फलटण बंद आणि प्रांताधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या "लक्ष्मी विलास पॅलेस" या फलटण येथील निवासस्थानाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ, माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे सातारा जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे, प्रा. भीमदेव बुरुंगले, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, पंचायत समिती माजी सभापती सौ. रेश्मा भोसले व सौ. लतिका अनपट, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सौ. राजश्री शिंदे, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, संजय गांधी निराधार व अनुदान योजना समिती अध्यक्ष बापूराव गावडे, निंभोरेचे उपसरपंच मुकुंदराव रणवरे, माजी उपसभापती संजय सोडमिसे व त्यांचे सहकारी पंचायत समिती सदस्य यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश दोशी, शिरीष दोषी, नितीन गांधी आदी मान्यवरांच्यासह शहर व तालुक्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.

लक्ष्मी विलास पॅलेस येथील बैठकीत बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

      राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबई येथील निवासस्थानावर एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हल्ला झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यामागचा बोलविता धनी वेगळा असू शकतो असे सांगून हल्लेखोर आणि ॲड. गुणवंत सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरु केली आहे, लवकरच त्याबाबत सविस्तर माहिती समोर येईल असे सांगून, महाराष्ट्रात राजकीय हेतुने झालेल्या आंदोलनापेक्षा लोकांच्या प्रश्नांसाठी झालेली आंदोलने तुम्हा आम्हा सर्वांनाच ज्ञात आहेत, तथापी खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा हेतू एसटी कामगारांच्या प्रश्नापेक्षा राजकीय हेतूने झाला असल्याचे एकूण परिस्थितीवरुन स्पष्ट दिसते. वास्तविक खा. शरद पवार यांनी आतापर्यंत गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय वाटचालीत कष्टकरी व श्रमिकांचीच बाजू घेतल्याची अनेक उदाहरणे सर्वांच्या समोर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही त्यांची भूमिका सौहार्दाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत त्याचप्रमाणे ऊस तोड मजुरांच्या पासून अन्य कष्टकऱ्यांच्या बाबतीत त्यांना न्याय देताना प्रसंगी शासन अथवा संबंधीत संस्थांच्यावर किती बोजा पडला या पेक्षा कष्टकऱ्यांना न्याय देण्याला खा. शरद पवार यांनी प्राध्यान्य दिल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले. 

    आताच्या एसटी संपातही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समवेत अनेक बैठका घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे खा. शरद पवार यांच्या निवास स्थानावरील हल्ला घडवून आणण्यात राजकीय हेतू स्पष्ट दिसून येत आहे. चौकशी नंतर हे सर्व निश्चितपणे समोर येईल असा विश्वास ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. 

      खा. शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत गेल्या काही वर्षात देशात व राज्यात राजकारणाचा दर्जा खालावला आहे. प्रत्येक गोष्टीत जे काही वाईट घडलं आहे, ते पवार साहेबांनीच केले असल्याचा आरोप केला जात असला तरी त्यामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत बदलत्या राजकीय संघर्षात जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. ईडीच्या नावाखाली जे आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होत आहेत त्याला राजकीय हेतूचाच वास आहे. इडीची कार्यवाही केवळ महाराष्ट्रात सुरु असल्याने त्यामधील राजकीय हेतू स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत या घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतानाच खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याच्या निषेधार्त फलटण बंद ठेवण्याची मागणी आ. दिपकराव चव्हाण यांनी यावेळी केली.

           राज्याची अस्मिता व लाखो नागरिकांचे दैवत असलेले खा. शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर जो भ्याड हल्ला झाला आहे, त्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत वास्तविक खा. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत, भाजपाने पवार साहेबांच्या विरोधात बोलणाऱ्यांना पदे दिली आहेत, त्यातून भाजपाची संस्कृती आता घसरली आहे.  निवडणूकीत हार व जीत होत असतात. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया छत्रपतींना न शोभणारी असल्याचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी नमूद केले.

प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी व मान्यवर.

       राज्यामध्ये कधीही न घडलेली घटना काल घडली, पवारसाहेबांच्या घरावर भ्याड हल्ला होत असेल तर ते राजकारण किती खालच्या थराला गेले हे स्पष्ट करणारे आहे, अशी परिस्थिती या पूर्वी कधीही आली नव्हती. खा. पवार साहेब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कधीही भूमिका घेतली नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी नेहमी सकारात्मक राजकारण केले आहे. विकासाच्या दृष्टीकोन बाजुला घेवून दिशाभूल करण्याचे काम सध्या देशात व राज्यामध्ये सुरु आहे. मराठा आरक्षणाबाबत सुध्दा दिशाभूल करण्याचे काम विरोधक करित आहेत. याचा सोक्ष मोक्ष आता लावण्याची गरज आहे. पवार साहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा आहे, हे दाखवण्याची सुद्धा गरज आहे. हल्ल्याच्या निषेधासाठी आज फलटण बंद ठेवण्यात येणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

   श्रीमंत रामराजे व आ. दिपकराव चव्हाण यांनी स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील गावागावात मंदिरे व त्यांचे सभामंडप उभारले असून आम्ही ही धर्म मानणारे, धार्मिक वृत्तीला पाठिंबा देणारे आहोत तथापी केवळ मंदिरे बांधून लोकांचे समाधान होत नाही, त्यासाठी विकास प्रक्रिया अखंडित सुरु ठेवावी लागते, त्याकडे दुर्लक्ष करुन धर्मभावनेचा डंका वाजवल्याने अंतीमतः लोकांचे नुकसानच होणार असल्याचे स्पष्ट करीत खा. शरद पवार यांच्या विचाराने पुरोगामी महाराष्ट्र उभा राहिला असताना त्याला जाती भेदाचे वळण देणे राज्याच्या हिताचे नसल्याचे स्पष्ट करीत आगामी काळामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन लोकांना विकासाची दिशा कोणी स्वीकारली आणि राज्याच्या विकासाला कोण गती देण्यात यशस्वी झाले याची माहिती देण्याची आवश्यकता श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केली.

     काही विषयाबाबतीत मतभेद असू शकतात तथापी त्यातून कोणा नेत्याच्या घरावर हल्ले झाल्याचे गेल्या पन्नास वर्षांच्याहून अधिक काळ ऐकिवात नाही. संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीसारखा गंभीर विषय तत्कालीन नेते कार्यकर्त्यांनी अत्यंत शांततेने, संयमाने हाताळला. त्याच पद्धतीने राज्यातील संघर्षाचे विषय शांतता व सयंमाने हाताळण्याची आवश्यकता आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व क्रांतिसिंह नाना पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याच पद्धतीने राज्यातील आताच्या प्रश्ना बाबत टोकाची भूमिका न घेता मतपेटीतून लोकांची मते आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न होण्याची आवश्यकता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. 

     या बैठकीनंतर उपस्थित सर्व नेते, कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करीत मोर्चा काढला आणि या घटनेचा निषेध करणारे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना देवून आमच्या भावना राज्यपाल महोदयांना कळविण्याची विनंती त्यांना करण्यात आली. 

    शांततेच्या मार्गाने निघालेला मोर्चा  निवेदन दिल्यानंतर विसर्जित करण्यात आला.

No comments