पोलिसांच्या हातावर तुरी! गुटख्याची गाडी चोराच्या घरी !!
फलटण पोलिस स्टेशनच्या आवारातून गुटख्याच्या गाडीची झाली चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ फेब्रुवारी - झिरपवाडी येथे अवैध गुटखा प्रकरणात पकडण्यात आलेली दोन वाहने गुटख्यासह फलटण शहर पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली होती, परंतु चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, फलटण शहर पोलीस स्टेशनच्या आवारातून त्यापैकी एक वाहन पळवून नेले आहे. ही परिस्थिति पाहून, पोलिसांच्या हातावर तुरी! गुटख्याची गाडी चोराच्या घरी !! असे म्हणण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी अज्ञातावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस निरीक्षक किंद्रे यांनी झिरपवाडी ता. फलटण येथे बँरीकेटींग लावून नाकाबंदी करीत असताना, अवैध गुटख्यासह एक पिकअप वाहन व एक छोटा हत्ती वाहन मिळुन आल्याने त्यांच्यावर कारवाई करून, सदरची वाहने त्यामध्ये असणाऱ्या गुटख्यासह पुढील कारवाईसाठी फलटण शहर पोलीस स्टेशनचे आवारात लावण्यात आली होती. मात्र त्याच रात्री दि. १ मार्च २०२२ रोजी पहाटे ३:५५ वाजण्याच्या सुमारास फलटण शहर पोलीस स्टेशन आवारातुन बदामी रंगाचा अशोक लेलंड कंपनीचा छोटा हत्ती वाहन त्यामध्ये असलेला अवैध गुटखा मालासह कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे. चोरून नेण्यात आलेल्या गाडीची गुटख्यासह किंमत ५ लाख रुपये होती.
No comments