फलटण नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय राजवटीत अर्थसंकल्प सादर ; खुल्या जागा व चौकांचे सुशोभीकरण - अंत्यसंस्कारासाठी निधी - कोणतीही करवाढ नाही
अर्थसंकल्प सादर करताना मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ फेब्रुवारी - फलटण नगर परिषद फलटणचे सन 2022-23 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. नगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय राजवटीत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 155 कोटी 11 लाखांचा अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला. या अर्थसंकल्पात प्रभागातील पायाभूत सुविधांसाठी तरतुद करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या वर्षी कोणत्याही प्रकारची करवाढ न झाल्याने सर्वसमान्य नागरीकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच जे फलटण शहरातील कर दाते आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च नगर परिषद फलटण यांचे तर्फे करण्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
फलटण पालिकेच्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृहामध्ये सोमवारी दि. 28/2/2022 रोजी सायंकाळी 4.00 वाजता प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेत सर्वप्रथम आरोग्य, पाणीपुरवठा, आस्थापना, जन्ममृत्यु व शहर विकास विभागाच्या यंदाच्या आर्थिक वर्षाच्या मागण्यांचा गायकवाड यांनी आढावा घेतला. मुख्य लेखापाल महेश सावंत यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर गायकवाड यांनी बीजभाषण केले. भागातील पायाभूत सुविधांसह शहरातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात आली आहे. शहरातील खुल्या जागा, चौक यांचे सुशोभीकरण करून शहराचा कायापालट केला जाईल असे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी सांगितले.
कोराना काळात घटलेली वसुली, चतुर्थ वार्षिक पाहणीचा खोळंबा, मोठ्या विकासकामांच्या योजनांची लोकवर्गणीमूळे खर्च यामुळे फलटण पालिकेच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडणार आहे. पालिकेने सलग तिस-या वर्षी कोणत्याही प्रकारची करवाढ न केल्याने नागरीकांना दिलासा दिला आहे. तसेच मुद्रांक शुल्क, रस्ता अनुदान आणि कोर्ट अनुदान यांच्या थकबाकी रकमेतून नगर पालिकेस 5 कोटी रुपये मिळणार आहेत. या सभेला मुख्य लेखापाल महेश सावंत सहायक लेखापाल ज्ञानदेव खामगळ मुख्य अभियंता पंढरीनाथ साठे लेखा विभाग लिपीक राजेंद्र पवार वसुली अधीक्षक वर्षा बडदरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
No comments