गणित नसेल तर जीवन शून्य - प्राचार्य रवींद्र येवले ; प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट मध्ये गणित दिन साजरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - जेष्ठ गणित तज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो, या दिनानिमित्त प्रा. रवींद्र येवले सर यांचे व्याख्यान प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्यु. कॉलेज कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. संध्याताई गायकवाड, मुख्याध्यापिका सौ. सुमन मकवाना, समन्वयका सौ.अहिल्या कवितके, पर्यवेक्षक अमित सस्ते तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
व्याख्यान कार्यक्रमात प्राचार्य रवींद्र येवले सर मार्गदर्शन करताना म्हणाले," आपल्या सर्वांना शालेय जीवनात अवघड वाटणाऱ्या गणित या विषयाची गोडी निर्माण झाली पाहिजे. दैनंदिन जीवनात गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. गणित नसेल तर जीवन शून्य आहे. विद्यार्थ्यांनी गणित हा विषय खूप आवडीने शिकला पाहिजे. असे सांगतानाच त्यांनी 0 ते 9 या अंकाचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांना गणित या विषयाच्या अभ्यासात प्रश्न पडलेच पाहिजेत, याशिवाय विद्यार्थ्यांना या क्षेत्रात गोडी निर्माण होणार नाही. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना गणिताच्या पायऱ्या शिकवून गुण मिळवायला शिकवतात, मात्र एखादी पायरी चुकली तर त्याचे गुण आणि विषयावरील मन उडते असे विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळे गणित विचार करायला शिकवतात, त्याच पद्धतीने ते शिकवले पाहिजे तसे झाले तर मुलांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देणे सुलभ जाते. तसेच कौशल्य विकसित होण्यासाठी गणित विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्राचार्य रवींद्र येवले यांनी सांगीतले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना हसत-खेळत संवाद साधत गणितीय संकल्पनाचा परिचय येवले सरांनी करून दिला.
यावेळी गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्यु. कॉलेजच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. रवींद्र येवले सर यांनी गणिततज्ञ रामानुजन त्यांच्या जीवनावर आधारित "दुर्दैवी प्रतिभावंत" हे पुस्तक शाळेच्या ग्रंथालयास भेट दिले.
No comments