फलटण नगर परिषदेवर प्रशासक म्हणुन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची नियुक्ती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २८ डिसेंबर २०२१ - : महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या सहीने सोमवार दि. २७ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व ८ ही नगर परिषदांच्या प्रशासक पदी मुख्याधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यानुसार फलटण नगर परिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची फलटण नगर परिषद प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्रात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने आणि या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने सदर संस्थांच्या पदाधिकारी/सदस्यांची मुदत संपल्यानंतर तेथे प्रशासक नियुक्तीबाबत निवडणूक आयोगाने कळविल्याने शासन निर्णयानुसार प्रशासक नियुक्ती करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद आहे.
सदर आदेशानुसार पुणे महसूल विभागातील मुदती संपलेल्या नगर परिषदांमध्ये प्रांताधिकारी/तहसीलदार व मुख्याधिकारी यांना प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर आणि वाई या सर्व ८ नगर परिषदांमध्ये प्रशासक म्हणून विद्यमान मुख्याधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
No comments