खासदार शरद पवार यांनी घेतली पद्मश्री बनबिहारी निंबकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
फलटण दि.३ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - कृषिसंशोधक पद्मश्री बनबिहारी विष्णू निंबकर यांचे वृद्धापकाळाने दि. २५ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पद्मश्री बनबिहारी निंबकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी जाई निंबकर व डॉक्टर कन्या नंदिनी, मंजिरी व चंदा यांसह कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
कृषिसंशोधक पद्मश्री बनबिहारी विष्णू निंबकर यांना श्रद्धांजली वाहताना, खासदार शरद पवार म्हणाले की, ५० च्या दशकात अमेरिकेतून भारतात स्थायिक होऊन फलटणजवळ त्यांनी निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू केली होती. कापसाचं नवं वाण विकसित करून महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाची कवाडं उघडली. पशुपालनाच्या क्षेत्रात विशेषतः मेंढीपालनात त्यांनी पिन्क रिव्होल्यूशन आणलं. मॅफकोच्या लोकप्रिय दुग्धपेयाला एनर्जी हे नावंही त्यांनीच दिलं. कृषिक्षेत्रातील कार्यासाठी त्यांना प्रतिष्ठेच्या जमनालाल बजाज पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. या महान शास्त्रज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली!

No comments