Breaking News

कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय अन्यायकारक : आत्मदहनाचा निवेदनाद्वारे इशारा

The decision to reduce Corona Warrior staff is unjust : Warning by self-immolation statement

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आमच्या अनुभव आणि त्यागी वृत्तीचा फायदा रुग्णांना मिळावा : सोहेल पठाण

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ : कोरोना दुसरी लाट अद्याप संपली नाही, आजही सातारा जिल्ह्यात दररोज ८००/९०० कोरोना बाधीत आढळत आहेत, संभाव्य तिसरी लाट उंबरठ्यावर असताना ज्यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेत जीवावर उदार होऊन कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये अहोरात्र काम केले त्यांना कामावरुन कमी करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव या कोरोना योद्यांवर अन्याय करणारा असल्याचे कोरोना योद्धा कर्मचारी परिषद सातारा जिल्हाध्यक्ष सोहेल पठाण यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना परिषदेचे पदाधिकारी, सभासद
      कोरोना पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणीही पुढे येण्यास धजावत नव्हते, त्यावेळी हे कंत्राटी कोविड कर्मचारी प्रसंगी स्वतःच्या व कुटुंबाच्या जीविताचा विचार न करता दाखल झाले, आणि सन २०२० पासून विविध पदाद्वारे कार्यरत आहेत, त्या पार्श्वभूमीवर आज कोरोना रुग्ण संख्या कमी झालेली नाही, संभाव्य तिसरी लाट अधिक भयानक असेल अशी भिती तज्ञ व्यक्त करीत आहेत, शासन तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वारंवार सांगून खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहे, अशा परिस्थितीत आम्हा अनुभवी कर्मचाऱ्यांना कमी करुन शासन/प्रशासन तिसरी लाट कशी थोपविणार असा सवाल करीत संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आमच्या अनुभव आणि त्यागी वृत्तीचा फायदा रुग्णांना मिळावा यासाठी आम्हाला कमी न करता सामावून घेवून कामाची संधी द्या अशी विनंती सर्व कोविड योद्यांच्यावतीने सोहेल पठाण यांनी केली आहे.
     शासन/प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय घेऊन आम्हा अनुभवी कोरोना योद्यांना कमी करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन, प्रसंगी आत्मदहन करावे लागेल असा इशारा सोहेल पठाण यांनी दिला आहे.
        कोरोना योद्या कर्मचारी परिषद पदाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना दिले असून या अधिकाऱ्यांना कोरोना योद्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेत व त्यानंतरही विविध योजना प्रभावी रीतीने राबविण्यासाठी सेवेत कायम ठेवून सेवेची संधी द्यावी अशी आग्रही मागणी केल्याचे सोहेल पठाण यांनी सांगितले.

No comments