Breaking News

सानुग्रह अनुदानासाठी २ लाख ६५ हजार रिक्षाचालकांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त

Received online applications of 2 lakh 65 thousand autorickshaw drivers for sanugrah grant

    मुंबई, दि. १०: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात परवानाधारक रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदान देण्यात येत असून सुमारे ७१ हजार रिक्षाचालकांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. उर्वरित परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

    कोरोनाच्या निर्बंध काळात दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांना एकूण १०८ कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले होते. राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत आहे.

    परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून ती दि. २२ मे २०२१ पासून परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता  खुली करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा चालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यापेकी ७१ हजार ४० रिक्षा चालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १ लाख ५ हजार रिक्षा चालकांच्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्याबाबत NPCI (National Payment Corporation Of India) यांना कळविण्यात आले आहे, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितले.

    सदर प्रणालीची माहिती विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरिता  परवानाधारक रिक्षा चालकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक असून, तो ज्या बँक खात्याशी जोडणी केलेला आहे त्या खात्यामध्ये सदर रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत आहे.

    रिक्षा परवानाधारकांना नवीन आधार क्रमांक काढण्याकरिता व मोबाईल क्रमांकाचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्याकरिता परिवहन कार्यालयांमध्येसुध्दा आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे.

    ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज दैनंदिनरित्या निकाली काढण्याकरिता राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांमध्ये कर्मचारी / अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नागरी संपर्क केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सदर योजनेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. १८००१२०८०४० या टोल फ्री नंबरवर आलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येत आहेत. रिक्षा परवानाधारकांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित करावे आणि आपला मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक करावा असे आवाहन मंत्री श्री. परब यांनी केले आहे.

No comments