Breaking News

जिवंत युवकाला केले मृत घोषित ; फलटण आरोग्य विभागाचा आंधळा कारभार

The living youth was declared dead ; Blind administration of Phaltan Health Department

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण :  आरोग्य विभागाकडून एका जिवंत युवकाला मृत घोषित करून, त्याच जिवंत माणसाला, कोरोनामुळे मृत पावल्याचे फोनद्वारे सांगितल्यामुळे, आरोग्य विभागाचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या फलटणमधील युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने युवकासह कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून फलटण तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीचा घोळ सुरु असून, तालुक्यातील नागरिक या आकडेवारीमुळे गोंधळात आहेत.  अशातच जिवंत युवकाला मृत घोषित केल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर संताप व्यक्त होत आहे

   सिद्धांत मिलिंद भोसले ( वय 20 ) राहणार मंगळवार पेठ,  फलटण  असे या युवकाचे नाव आहे . सिद्धांतची गेल्या महिन्यात कोरोना टेस्ट पॅझिटिव्ह आली होती. त्याने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले व गेल्या महिन्याभरापासून तो व्यवस्थित आहे. 

    सोमवारी दि. ७ जून २०२१ रोजी  सिद्धांत घरी असताना त्याचा मोबाईल वाजला. सिद्धांतने मोबाईल उचलला असता, पलिकडील महिला आरोग्य कर्मचाऱ्याने सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बातमी कळवली.  हे ऐकूण सिद्धांतला काही सुचेना. त्याने आपली आई सपना भोसले यांना 'हे बघ काय सांगताहेत ' असे म्हणत फोन दिला. त्यांनाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बाब सांगितली. आपला मुलगा समोर असताना, हे काय अभद्र निरोप देत आहेत , असे म्हणत त्याच्या आईने थेट सरकारी रुग्णालय गाठले. त्यानंतर तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता, आम्हाला आलेल्या यादीप्रमाणे निरोप देण्याचे काम केले आहे , असे सांगत आरोग्य कर्मचाऱ्यांनी हात वर केले.

    या घटनेमुळे कालपासून भोसले कुटुंब चक्रावलेवल्या अवस्थेत आहे. जिवंत मुलाला मृत घोषित करण्याच्या या प्रकारामुळे भोसले कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे .कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने युवकासह कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भोसले कुटूंबियांनी याप्रकरणी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

No comments