वडजल ता. फलटण येथे नवजात अर्भक फेकून अज्ञात पसार
फलटण दि. 17 मे, 2021 (प्रतिनिधी) -: वडजल ता. फलटण येथे मोकळ्या जागेत नवजात मुलीचे अर्भक बेवारसपणे टाकुन अज्ञात आरोपी पळून गेला आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मानवतेला कलंक लावणाऱ्या या कृत्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, वडजल ता. फलटण येथे,वाठार फाटा ते वडजल या रोडलगत दत्तात्रय विठ्ठल घाडगे यांच्या मालकीच्या गट नंबर १३९ या शेतातील गोडाऊन जवळ असलेल्या मोकळ्या जागेत, दोन ते तीन दिवसापूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक कोणीतरी सोडून गेले असून, सकाळी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास एक लहान बाळ कपड्यात गुंडाळून मोकळ्या जागेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी सदरची घटना पोलिस स्टेशनला कळवली असता, पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या लहान बाळास उपजिल्हा रुग्णालयात या प्राथमिक उपचार करून म्हसवड येथे ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भा. द. वि. स. कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बेवारसपणे अर्भक येथे कोणी सोडले याचा पोलिस तपास घेत आहेत . या बाबतीत कोणाला माहिती असल्यास ग्रामीण पोलिसांनी कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
No comments