Breaking News

समाजाबरोबर चालणाऱ्या मराठी रंगभूमीची वाटचाल कलादालनातून प्रेक्षकांना अनुभवता यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

The audience should be able to experience the journey of Marathi theater with the society through the art gallery - Chief Minister Uddhav Thackeray

    मुंबई  -: मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगमंच कलादालनाच्या उभारणीचा आराखडा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निश्चित करण्यात आला.

    कलादान स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील अशी अपेक्षा आहे, त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

    दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्याचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे तसेच बिर्ला क्रीडा केंद्राच्या वास्तुचा पुनर्विकास व कलादालनाच्या निर्मितीकरिता स्थापन समितीचे सदस्य अभिनेते सर्वश्री आदेश बांदेकर, विजय केंकरे,  सुबोध भावे, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्यासह अन्य शासकीय सदस्य आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येईल, असे नियोजन व्हावे. याठिकाणी नाटक पाहता येईल, पण प्रेक्षकाना मराठी रंगभूमीची वाटचालही अनुभवता येईल. ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र तर व्हावेच, पण त्याचबरोबर रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखवणारे उत्तम असे संग्रहालय साकारण्यात यावे. संग्रहालय आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हावे असे नियोजन आतापासूनच करण्यात यावे.

    कलादालनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास दृक-श्राव्य संग्रहालय, त्रिमिती सादरीकरणाची व्यवस्था याबराबरोच रंगभूमीच्या वाटचालीशी निगडीत शासनाच्या विविध विभागांकडे उपलब्ध संदर्भ, दस्तऐवज आदी गोष्टींबाबत समन्वय साधण्याचे आणि या कामाला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले.

    या कलादालनासाठी 175 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आराखडा निश्चिती तसेच विविध संकल्पना आणि कार्यान्वयनांसाठी 10 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

    अठरा दालने आणि अद्ययावत सभागृह, ग्रंथालय अशा विविध सुविधांनी युक्त असा या कलादालनाबाबतचा आराखडा वास्तू रचनाकार शशांक मेहंदळे, पराग केंद्रेकर यांनी सादर केला, चर्चेअंती हा आराखडा निश्चित करण्यात आला.

No comments