Breaking News

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा; २८ फेब्रुवारीपर्यंत नवीन महाविद्यालयांसाठी प्रस्ताव स्वीकारणार

 मंत्रिमंडळ निर्णय
Cabinet decision - Amendments to the Maharashtra University of Health Sciences Act; Proposals for new colleges will be accepted till February 28

        मंत्रिमंडळ निर्णय : दि. 14  जानेवारी 2021 -  आरोग्‍य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्याप्रमाणे सुधारणा करून अध्यादेश काढण्यात येईल.

        कोव्हिड-१९ मुळे बहुतांशी सामाजिक व आर्थिक व्यवहार / घडामोडी मंदावल्याने/ थांबलेल्या असल्याने, विविध संस्थांच्या महाविद्यालय इमारत तसेच हॉस्पीटल यांचे बांधकाम, त्यांच्या परवानग्या, नोंदणी तसेच कागदपत्र तयार करण्यास बऱ्याच अडचणी येऊन, निकषांची पुर्तता करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिसुचनेमधील अंतिम मुदतीपर्यंत (३१ ऑक्टोबर, २०२० पर्यंत) परीपूर्ण प्रस्ताव सादर करणे शक्य झाले नाही.

        त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मधील या कलमांमध्ये आरोग्‍य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा विचार सुरु होता. त्यानुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998 मध्ये अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

        आता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी, उच्चतर शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा संस्था सुरु करण्यासाठी परवानगी मागणारे व्यवस्थापन, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिवाकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकणार आहे.  तसेच सर्व अर्जांची विद्यापीठामार्फत नियोजन मंडळाकडून छाननी करून आणि व्यवस्थापन परिषदेच्या संमतीने ते अर्ज व्यवस्थापन परिषदेला उचित वाटतील अशा शिफारशींसह दिनांक ३० एप्रिल, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी शासनाकडे पाठवण्यात येतील.

No comments