Breaking News

अतिक्रमण मोहिम पुन्हा सुरु करावी यासाठी केलेले धरणे आंदोलन स्थगित

युवराज शिंदे व मितेश खराडे यांना पत्र देताना प्रसाद काटकर शेजारी युवराज पवार, फिरोज बागवान, पंढरीनाथ साठे, मुश्ताक महात

     फलटण - : फलटण शहरात फलटण नगरपरिषदेने सुरु करुन स्थगित केलेली  अतिक्रमण हटाव मोहिम पुन्हा सुरु करावी या मागणीसाठी मनसेचे जिल्हा उपप्रमुख युवराज शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मितेश तथा काकासाहेब खराडे यांचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी आंदोलन स्थळी भेट देवून लेखी पत्र दिल्याने हे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

      फलटण नगरपरिषदेने गेल्या मार्च महिन्यामध्ये अतिक्रमण मोहिम शहरात सुरु केली होती. सदर मोहिम  तीन दिवस चालल्यानंतर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होउ नये व तो संसर्गजन्य असल्याने त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात होउ नये या करीता राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागु झाल्याने या अतिक्रमण मोहिमेस तात्पुरती स्थगीती देण्यात आली होती. फलटण नगरपरिषदेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेत गोरगरीबांच्या अतिक्रमणांवर हातोडा व जेसीबी चालविण्यात आला होता. मात्र बड्या धेंडानी केलेली अतिक्रमणे अद्यापही शाबुत आहेत. त्यामुळे या मोहिमेने गोरगरीबांबर व हातावरचे पोट असणार्या अनेक छोट्या व्यावसायिकांवर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया शहरभरातुन उमटत होत्या. तसेच अतिक्रमण हटाव मोहिम आता पुन्हा सुरु करण्याची नगरपरिषदेची मानसिकता नाही असा कयास करुन अनेकांनी हटविलेल्या जागी पुन्हा पक्क्या व कच्च्या स्वरुपातील बांधकामांना प्रारंभ केला आहे. तसेच मुख्य व वर्दळीचे रस्ते व चौक येथील हटविलेल्या अतिक्रमणांचा राडारोडा जागीच असल्यानेही वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपुर्वी शहरातील स्थगीत केलेली अतिक्रमण मोहिम पुन्हा सुरु करावी यासाठी दि. २१ डिसेंबर पासुन शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मनसेचे उपजिल्हा प्रमुख युवराज शिंदे व काकासाहेब खराडे यांनी अतिक्रमण हटाव मोहिम पुन्हा सुरु व्हावी या करिता बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केला होता. आंदोलनाच्या तिसर्या दिवशी रात्री ऊशीरा मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. युवराज शिंदे व मितेश खराडे यांच्याशी चर्चा करुन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या परवानगीने सदर मोहिम लवकरात लवकर सुरु करु असे लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

No comments