Breaking News

'त्यांना' धर्मावर आधारित हुकूमशाही या देशात आणायची आहे - पृथ्वीराज चव्हाण

मेळाव्याच्या प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करताना मान्यवर  (छाया - बंडू चांगण)
      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  त्यांना, धर्मावर आधारित हुकूमशाही या देशात आणायची आहे, लोकशाहीच्या सर्व संस्था हळूहळू कॅप्चर करणे चालू आहे, सर्वोच्च न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल किंवा ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा दुरुपयोग करून, लोकशाहीचा ढांचा जरी वर दिसत असेल, तरी आतमध्ये त्यांचा जीव व  प्राण काढून घेण्याचे काम चालू आहे, खऱ्या अर्थाने त्यांना घटनाच मान्य नाही, घटना निष्प्रभ करून एक वेगळ्या प्रकारचे धर्मावर आधारित राजकारण त्यांना पुढे आणायचे आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व काँग्रेसने दिलेली राज्यघटनाच यांना मान्य नाही, हे राज्यघटना संपवायला लागलेले आहेत. हे देशाची लोकशाही संपवायला लागले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, भारतीय जनता पार्टी वर केली.

         पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीत काँग्रेस पुरस्कृत शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व राष्ट्रवादी पुरस्कृत पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या, यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात चव्हाण बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सभापती श्रीमंत  रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार दिपकराव चव्हाण, जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, ॲड. उदयसिंह पाटील, रणजित लाड, सचिन सूर्यवंशी-बेडके, रणजितसिंह देशमुख, डॉ. सुरेश जाधव, मनोहर शिंदे, महेंद्र सूर्यवंशी-बेडके, अमरदीप लाड, सौ. सुजाता सुनिल गायकवाड, नगरसेविका सौ. ज्योती अरुण खरात, राजेंद्र शेलार, विकास नाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

मेळाव्यात बोलताना पृथ्वीराज चव्हाण  व्यासपीठावार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सतेज पाटील,  दिपकराव चव्हाण, रणजीतसिंह देशमुख, सुभाषराव शिंदे,  सचिन सूर्यवंशी-बेडके, महेंद्र सूर्यवंशी-बेडके 

      सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आहे, त्यामुळे भविष्यात येवू घातलेला धोका वेळीच ओळखून या निवडणूकीसाठी मतदान करणे आवश्यक आहे, हे देशाची लोकशाही संपवायला लागले आहेत, हा धोका ओळखूनच महाआघाडी निवडणुकीत उतरली आहे. म्हणून महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार  प्रा. जयंत दिनकर आसगावकर व पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण गणपती लाड यांना विजयी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.   

       देशाची अर्थव्यवस्था कोसळायला लागली आहे. असलेले कारखाने बंद पडत आहेत, नवीन कारखाने सुरु होत नाहीत, त्यामुळे रोजगार निर्माण होणार तरी कसा असा सवाल व्यक्त करुन गेल्या पंचेचाळीस वर्षात बेरोजगारीचा सर्वात जास्त दर या वर्षी पहावयास मिळाला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोव्हिड पुर्वीच कोसळली आहे. मोदी सरकारने नोटबंदी, जीएसटीसारखे हल्ले केल्याने कोव्हिड पुर्वीच अर्थव्यवस्था ३.१ टक्क्यापर्यंत खाली आली. युपीए सरकारच्या काळात विकास दर साडे नऊ टक्के होता.  सदर निवडणूक भाजपाला रोखायची निवडणूक आहे. जीथे भाजपाच्या विचारांना आजवर यश आलं तीथे आपण त्यांना रोखलं तर ज्या कारणाने महाआघाडी सरकार अस्तित्वात आले ते कारण सफल झाले अस आपणास म्हणता येईल असे सांगून या निवडणूकीत महाआघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

... तर निश्चितपणे विजय आपला आहे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

मेळाव्यात बोलताना  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व्यासपीठावार पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील,  दिपकराव चव्हाण, रणजीतसिंह देशमुख, सुभाषराव शिंदे,  सचिन सूर्यवंशी-बेडके, महेंद्र सूर्यवंशी-बेडके व अन्य

   फलटणमध्ये दोन शैक्षणिक संस्था महत्त्वाच्या आहेत, एक फलटण एज्युकेशन व दुसरी श्रीराम एज्युकेशन आणि या दोन्ही संस्था महाविकास आघाडी बरोबर आहेत, त्यामुळे फलटण तालुक्यातुन मतदान महाविकास आघाडीलाच होईल यात शंका नाही. आज महाराष्ट्राचे बदललेले राजकीय स्वरूप, सरकारचं प्रतिबिंब म्हणून दिसून येते, सातारा जिल्ह्यात गावागावात काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेचे लोक आहेत, गावागावात राष्ट्रवादी व कॉंग्रेसची मते आहेत, तरुण वर्ग शिवसेनेच्या पाठीशी आहे,  हे सर्व गावपातळीवर आपण एकत्र करू शकलो तर निश्चितपणे विजय आपला आहे असा विश्वास देतानाच, गावपातळीवरील कार्यकर्त्यांना, संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले तसेच महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत दिनकर आसगावकर व पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण गणपती लाड  यांना विजयी करण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

        पूर्वी काँग्रेसने व नंतर राष्ट्रवादी व काँग्रेस मिळून हा मतदारसंघ भाजपला बहाल केल्या सारखा होता, या  इलेक्शन कडे व मतदारसंघाकडे दुर्लक्षच केले होते. पुणे जिल्ह्याचा या निवडणुकीत दबदबा असल्याचे आपण ऐकतो, पुणे जरी शिक्षणाचे केंद्र असले, तरी ग्रामीण भागातही आता शैक्षणिक संस्था वाढत चालल्या आहेत आणि यातून बाहेर पडलेल्या पदवीधरांची जर नोंद झाली आणि शिक्षक  एकत्र आले तरी आपणही समर्थपणे  विरोधकांना तोंड देऊ शकतो असे स्पष्ट मत विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

        या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गावागावात बाहेर पडून सर्व मतदारांना मतदान केंद्रावर आणायला लागणार आहे, कारण मतदान वाढल्यानंतरच या निवडणुकीचे खरे स्वरूप पुढे येणार आहे. आजपर्यंत सर्व साधारण तीस टक्के मतदाना वरच प्रतिनिधित्व निवडले जायचं परंतु जर मतदान वाढले तर खऱ्या लोकशाहीने नेतृत्व निवडले जाईल, यासाठी मतदान वाढणे गरजेचे आहे. त्यासाठीच कार्यकर्त्यांनी वार्डा - वार्डात गावा-गावात जाऊन मतदारांना, मतदान केंद्रावर आणले पाहिजे असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

पदवीधरांचे नेतृत्व करून महसूलमंत्री झालेल्यांच्या कार्यकाळात राज्याची बेरोजगारी फक्त वाढली -  ना. सतेज पाटील

मेळाव्यात बोलताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील व्यासपीठावार  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील,  दिपकराव चव्हाण, रणजीतसिंह देशमुख, सुभाषराव शिंदे,  सचिन सूर्यवंशी-बेडके, महेंद्र सूर्यवंशी-बेडके व अन्य

        ज्या मंडळींनी या शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले, त्यांनी शिक्षकांचे कोणते प्रश्न सोडवले आणि ज्या लोकांनी पदवीधर संघाचे प्रतिनिधित्व केले त्यांनी पदवीधरांचे कोणते प्रश्न सोडवले ? मागच्या पाच वर्षात फक्त बेरोजगारी वाढली आहे,याचा हिशोब आपल्याला करावा लागणार आहे, जे पदवीधरांचे नेतृत्व करून राज्याचे महसूलमंत्री झाले, त्यांच्या कार्यकाळात राज्याची बेरोजगारी फक्त वाढली गेली, पवित्र पोर्टल काही झाले नाही, मात्र बेरोजगारी  वाढली. मागील पाच वर्षे अशीच वाऱ्यावर गेली असल्याची टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर केली. 

        आज गरज आहे एका अभ्यासू नेतृत्वाची,  प्रश्न अनेक आहेत, माध्यमिक पासून यूजीसी पर्यंत वेगवेगळे प्रश्न आहेत. परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही.  न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे यावर चर्चा झाली पाहिजे.  पूर्वी या देशामध्ये जी शैक्षणिक धोरणे झाली, ती सर्वधर्म समभावाची धोरणे होती. घटनेवर आधारित धोरणे होती , परंतु आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आली आहे, ती एका विचारसरणीने भरून आली आहे, या धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर खरा कठीण काळ तुमच्या आमच्या समोर तसेच शिक्षण क्षेत्रासमोर असणार आहे, या पॉलिसीमध्ये  प्राध्यापकांचे ऑडिट, शाळेचे थर्ड पार्टी ऑडिट अशा अनेक जाचक अटी आहेत आणि या सगळ्या धोरणाच्या विरोधात आपल्याला लढाई करायची असेल, तर आपला कणखर आवाज विधानपरिषदेत पोहोचवला पाहिजे. त्यासाठी निवडणूकीत महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार  प्रा. जयंत दिनकर आसगावकर व पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण गणपती लाड  यांना निवडूण देण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

       उपस्थित सर्वांचे स्वागत श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सचिव व नगरसेवक शसचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) व कॉंग्रेसचे युवा नेते महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी करून संवाद मेळाव्याला उपस्थित राहील्याबद्दल उपस्थित सर्वांचे स्वागत केले.

 मेळाव्याच्या प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व घटक पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. 

No comments