मराठी संशोधकांची ज्ञानपरंपरा घेऊन समृद्धीसाठी संशोधन व्हावे- प्रा.डॉ.रणधीर शिंदे

भाषा व साहित्य संशोधन :पुनर्विचार व नव्या दिशा या विषयावर
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
सातारा : ‘आजचे संशोधन हे यु.जी.सीचा फोर्स, बढती, नियुक्ती इत्यादी कारणासाठी केले जात असून संशोधन परंपरेला अस्वस्थ करणारे असे हे चित्र आहे. ऑनलाईन नियतकालिके,आय.एस .एस.एन, आय.एस.बी.एन.अशी गोंडस नावे देऊन आज संशोधन पेपर,पत्रिका काढल्या जात आहेत. ए.पी.आय स्कोअर जास्त होण्यासाठी केवळ संशोधन पेपर लिहिले जातात. खेळाडू जसे धावा काढून स्कोअर वाढवतात तसे हे आहे. संशोधनातील नैतिकता यात हरवून गेली आहे.भाषा कोणती रूपे धारण करते आहे याकडे संशोधकांचे लक्ष नाही.अशावेळी ज्यांनी कोणत्याही लाभाची अपेक्षा केली नाही अशा संशोधन करणाऱ्या मराठीतील संशोधकांची ज्ञानपरंपरा घेऊन ज्ञान समृद्धीसाठी संशोधन करावे’’असे विचार शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधि विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.रणधीर शिंदे यांनी व व्यक्त केले. ते सातारा येथील रयत शिक्षण संस्थच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभाग,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ,कोल्हापूर यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ‘’भाषा व साहित्य संशोधन :पुनर्विचार आणि नव्या दिशा‘ या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये बोलत होते.,मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे डॉ.शिवकुमार सोनाळकर,सचिव डॉ.प्रकाश दुकळे, वेबिनार समन्वयक प्रा.गजानन चव्हाण व डॉ .कांचन नलावडे हे या वेळी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ .विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने सदर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
संशोधनाबाबत अजूनही मराठीत करण्याजोगे बरेच काम असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की. भारतीय भाषा ही जगातली सर्वात मोठी अशी भाषाभ्यासाची बीजभूमी आहे. मोहन लोंढे यांचे मातंगाची बोली ,नंदकुमार मोरे यांची चंदगडी बोली,यासारखे संशोधन व्हायला हवे असे त्यांनी सांगितले.काळाबरोबर वस्तू निघून जातात, वस्तू गेली की भाषिकचिन्हे निघून जातात. म्हणूनच व्याकरणिक कोष,महानुभाव शब्दकोश,संतसाहित्य शब्दकोष,धर्मविधी कोष, दागिने शब्दकोष ,राजकारण शब्दकोष ,इत्यादी शब्दकोष मोठ्या प्रमाणात मराठीत तयार व्हावेत व त्याद्वारे भाषिक चिन्हे व ज्ञान जतन करावे. नव्या तंत्रज्ञानाने भाषा बदलत आहे यासाठी देखील भाषिक सामग्रीची आवश्यकता आहे. अनुवाद आणि भाषांतर यांची गरज आहे. नवमार्केट घडविण्यासाठी शिक्षकांनी ज्ञानसंचय करायला हवा. तंत्रज्ञान कौशल्ये आत्मसात करावीत.जगातील छोट्या भाषा मरणपंथाला लागल्या आहेत, भाषाचिन्ह नाहीसे झाले की संस्कृतीचे अधःपतन होते. वर्तमान काळातील भाषाभूमी ही स्मशानभूमी होत आहे इतिहास,परंपरा,संस्कृती आविष्कार या अंगाने भाषा साहित्याचा शोध घ्यायला हवा आहे. साहित्यात आलेले सांस्कृतिक समाजशास्त्र हे दलित साहित्यामुळे आपल्याला कळले. विद्रोह,दाब,नकार,रगचिन्हे,पुराणकथा,मौखिक साहित्य,एखादा लेखक कोणते साहित्यप्रकार वापरतो ,याचा देखील अभ्यास होण्याची गरज आहे.संशोधनातील अनैतिक आर्थिक संबंध हा रोग आहे असेही ते म्हणाले .
वेबिनार मध्ये दुसऱ्या सत्रात मॉरिशस येथील मराठी अभ्यास केंद्रातील डॉ.बिदन आबा यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले की काळ बदलतो तशी संशोधनात नवी विचार पद्धती आणली पाहिजे.दिशाभूल करणारे संशोधन हे घातक असते. संशोधनात प्रामाणिकपणा,जिज्ञासूवृत्ती ,चिकाटी ,सहिष्णुता,वस्तुनिष्ठता,निपक्षपातीपणा,तटस्थता,इत्यादी गुण संशोधकजवळ हवे. शोधवृत्तीने समाजाला फायदे होतात.आपल्या संशोधनात कट पेस्ट हे प्रकार जास्त असून आपण इंग्रजीप्रमाणे मराठीत देखील दुसरीकडून काय घेतले हे शोधणारे डिव्हाईस तयार करायला हवे असे ते म्हणाले.संशोधन कार्यात मार्गदर्शक हा संशोधकाला गती देणारा आणि विचारी असायला पाहिजे. विद्यार्थ्याचा अपमान करणारा प्राध्यापक मार्गदर्शक असेल संशोधन कार्य नीट होणार नाही.
तिसऱ्या सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे व्याख्यान झाले. ते म्हणालेकी ‘जगात मध्यम वर्ग हा भूमिका नसलेला आहे. कोणत्याही संशोधनात नवीन काय हे अभिप्रेत असते. समाज आणि संस्कृती या वरील संशोधन झाल्यास अनेक नव्या गोष्टी पुढे येतील. संशोधकास अन्वेषण दृष्टीची गरज आहे. सांस्कृतिक ,सामाजिक ,धार्मिक,.राजकीय,लैंगिक .इत्यादी दृष्टीने मूल्यनिष्ठ भूमिका व ज्ञाननिष्ठ भूमिका संशोधकाने तपासली पाहिजे. विद्यापीठ अनुदान आयोगाने घातलेल्या चौकटी,म्हणजे संशोधन नाही. संशोधकात ज्ञाननिष्ठता व मूल्यनिष्ठता नसल्याने संशोधन गंभीरपणे होत नाही. पीएच.डी पदवीचा संबंध नोकरी पदोन्नती यासाठी ठेवू नये इरावती कर्वे ,रा.चि.ढेरे ,वि.ल.भावे ,मो.के.दामले ,गणेश देवी,प्रभाकर मांडे, आ.ह.साळुंखे,सुधीर रसाळ,वि.भि.कोलते,या मराठीतील संशोधकांचा वारसा घ्यावा.मराठीत संशोधन विषयाची पुनरावृत्ती होत आहे.त्यासाठी महाराष्ट्रातल्या चांगल्या संशोधकांनी नवीन विषयांची यादी तयार करावयास हवी.अठरा पगड जातीतील ज्ञान परंपरा काय होती याचा अभ्यास आवश्यक आहे .१९५० नंतर नवी मूल्यदृष्टी आपल्या देशाला संविधानाने दिली असून आज परंपरा मूल्य आणि संविधानिक मूल्य यांच्यात काय चालले आहे याचा शोध अजून घेणे आवश्यक आहे.साहित्य संशोधनात तौलनिक अभ्यास करण्याची देखील गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.अनिसा मुजावर यांनी महाविद्यालयाची माहिती सांगितली . अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष चे डॉ.अनिल वावरे यांनी संशोधन संदर्भात यु.जी.सी .व शासनाची भूमिका स्पष्ट केली. मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ .सुभाष वाघमारे यांनी वेबिनार विषयाची भूमिका स्पष्ट केली. प्रा.डॉ.मानसी लाटकर यांनी सर्व वक्त्यांचा परिचय करून दिला. आभार डॉ.कांचन नलावडे यांनी मानले. समन्वयक प्रा.गजानन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.सुरेश झोडगे व प्रा.मनोहर निकम यांनी झूम व युटूबद्वारे जगभर प्रसारणकेले.प्रसिद्धी सहकार्य प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे यांनी केले. प्रश्नोत्तर सत्र झाले.वेबिनार साठी भारतातील सर्व विद्यापीठातील मराठी विभाग तसेच जगातील मराठी अभ्यास केंद्राचे प्रतिनिधी सहभागी झाले.
No comments