Breaking News

शासन व शेतकरी यांच्यातील जमीन दराचा प्रश्न सोडविताना शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

प्रस्तावित अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या जागेची पाहणी करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

स्वत: मध्यस्थी करुन योग्य निर्णय घेणार - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर 

            फलटण : फलटण येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत विकसीत करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती सभागृहात आयोजित संबंधीत शेतकर्‍यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून जमिनीच्या दराबाबतचा विषय शासन व शेतकरी यांच्यातील समन्वयातून सोडविताना शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, यासाठी आपण स्वत: मध्यस्थी करुन योग्य निर्णय घेणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी दिली आहे.

         कमिन्स आंतरराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून सुरवडी औद्योगिक वसाहत प्रत्यक्ष औद्योगिक प्रकल्पांच्या उभारणी होवून कामकाज सुरु झाले आहे. तालुक्याला त्याचा लाभ मिळत असतानाच अतिरिक्त औद्योगिक वसाहत क्षेत्र विकसीत करण्याच्या दृष्टीने नांदल, मिरगांव, ढवळेवाडी, सुरवडी, निंभोरे येथील शेतकर्‍यांच्या बैठकीत मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) बोलत होते. यावेळी मा.आ.दिपकराव चव्हाण, मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबईचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती कदम, प्रांताधिकारी मा.डॉ.शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार मा.श्री.आर.सी.पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूरचे विभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि नांदल, मिरगांव, ढवळेवाडी, सुरवडी, निंभोरे येथील संबंधीत शेतकरी उपस्थित होते.

पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्री.सुभेदार, श्रीमती कदम
         महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरवडी येथील औद्योगिक वसाहत विकसित झाल्यानंतर तेथे कमिन्स आंतरराष्ट्रीय कंपनीचे ७/८ प्लॅन्ट उभारण्यात आले असून या कंपनीच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी, तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून कमिन्सच्या सहकार्याने अभियांत्रिकी शिक्षणाच्या अनेक संधी, छोटे उद्योग व्यवसायिकांना काही संधी उपलब्ध झाल्या असून औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाल्याने तालुक्यातील आर्थिक क्षेत्र काही प्रमाणात गतीमान करण्याची संधीही प्राप्त झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्त क्षेत्र विकसित करुन तेथेही औद्योगिक उत्पादन सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येणार असल्याने त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आजच्या बैठकीत शेतजमीन मालकांनीही सकारात्मक भुमिका घेतली असल्याने आगामी काळात सदरची वसाहत विकसित करण्याला आपले प्राधान्य राहील याची ग्वाही मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी यावेळी दिली.

         वरील ४/५ गावातील सुमारे ३०० एकर क्षेत्र अतिरिक्त औद्योगिक वसाहत म्हणून विकसित करण्याचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा प्रयत्न असल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट झाले आहे. सदरच्या जमिनी अधिगृहीत करताना शेतकर्‍यांना द्यावयाच्या मोबदल्यामध्ये शासन व शेतकरी यांच्यामध्ये योग्य समन्वयाने मार्ग काढून शेतकर्‍यांचे नुकसान न होता सदरची प्रक्रिया व्यवस्थीतरित्या पार पाडून फलटणच्या औद्योगिक वसाहतीची विस्तारवाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेवून आपण प्रयत्न करीत आहोत, आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने त्यामध्ये निश्‍चित यश मिळेल असा विश्‍वास मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाजेब) यांनी व्यक्त केला आहे.

         पंचायत समिती मधील बैठकीनंतर मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या समवेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकारी, स्थानिक अधिकारी, शेतकरी यांनी प्रस्तावित अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या जागेची पाहणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली.


No comments