Breaking News

कोरोना मैदानात मात्र तलवारी म्यान


फलटणच्या बाजारपेठेतील गर्दी व तोंडाला मास्क न घालता फिरणारे नागरिक (छाया - गंधवार्ता, फलटण)

फलटण (अ‍ॅड. रोहित अहिवळे) -  शत्रू  मैदानात नव्हता त्यावेळी आपला युद्धसराव जोरात सुरू होता, तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना करून शत्रूला आडवण्याचे डावपेच सुरू होते, मात्र आता शत्रू मैदानात शिरला आहे तरी कोणीही त्याकडे लक्ष देत नाहीये, जणूकाही योद्ध्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत असे चित्र दिसू लागले आहे....
कोरोना रुपी शत्रू आपला संसर्ग  जसा पसरवु लागला तसा प्रशासनासह राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिक यांनी कोरोना शत्रुशी दोन हात करत, त्यास यशस्वीरित्या 2 ते 3 महिने थोपवून धरले, परंतु कोरोनाने आपले हातपाय फलटणकडे पसरवल्यानंतर मात्र प्रशासन आणि नागरिक निष्क्रीय झाल्याचे दिसून येत आहे. सध्या फलटणमध्ये कोणतेही सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही विनाकारण गर्दी करू दिली जातेय, दुकाने सांयकाळी 5 च्या पुढे सुरू असल्याची दिसतात, बाहेर फिरणाऱ्या कित्येक जणांच्या तोंडाला मास्क देखील नसते, दुचाकी वाहनावरून ट्रिपल सीट वाहतूक होताना दिसत आहे, कंटेनमेंट झोन मध्ये देखील माणसे बाहेर फिरताना दिसत आहेत, दुकाने सुरू असल्याचे दिसत आहेत जर कंटेनमेंट झोन'मध्ये अशी परिस्थिती असेल तर झोन बाहेर पहायलाच नको!  एकूणच प्रशासनाने तसेच नागरिकांनी आपले लक्ष कमी करून आपल्या तलवारी म्यान केल्याचे चित्र दिसत आहे. 
फलटण येथील शंकर मार्केट परिसर - नगर पालिकेची गाडी फिरत असतांनाही नागरिकांनी व विक्रेत्यानी केलेली गर्दी 

आज तालुक्यासह फलटण शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना, प्रशासन हे फक्त कोरोना बाधित रुग्ण सापडला! की त्यावर दिलेल्या नियमा नुसार प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून, रस्ते बंद करून अंमलबजावणी करण्याच्या मागे आहेत. परंतु  शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे अंमलबजावणी पूर्ण व्यवस्थित झाली का? याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करतानाही दिसत नाहीत, नागरिकांच्या गर्दीकडे दुर्लक्ष केले जात आहे, भाजी मंडई बसत असते त्याठिकाणी नगरपालिकेची गाडी फिरत असताना देखील गर्दी व सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही.  तंबाखु, गुटखा खाणारे बिनधास्त सर्वत्र पिचकाऱ्या मारत आहेत याकडे प्रशासनाने तसेच नागरिकांनीही वेळीच लक्ष दिले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.

No comments