श्रीराम व स्वराज कारखान्यांना राजू शेट्टींचा इशारा!
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ -स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ठाम भूमिकेमुळे श्रीराम सहकारी साखर कारखाना भाड्याने न देता तो सुरू करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांमुळेच श्रीराम कारखाना सुरू झाला. मात्र, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल ३ हजार ९०० रुपये जाहीर केली असताना श्रीराम कारखान्याने ३ हजार ८०० रुपये जाहीर करणे योग्य नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
श्रीराम कारखाना व्यवस्थापनाने तातडीने ३ हजार ९०० रुपये पहिली उचल जाहीर करावी. तसेच स्वराज कारखान्याने मागील वर्षीचे २०० रुपये अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, ते तातडीने अदा करावेत, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
दोन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावेत. अन्यथा श्रीराम व स्वराज या दोन्ही कारखान्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुळकर व अन्य सहकारी उपस्थित होते.

No comments