Breaking News

फलटण तालुक्यात दोन डीपी फोडून तांब्याच्या तारा चोरीला ; महावितरणचे नुकसान

Copper wires stolen by breaking two DPs in Phaltan taluka; loss to Mahavitaran

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ : फलटण तालुक्यातील जिंती आणि विडणी गावांच्या हद्दीतील दोन विद्युत रोहित्रांचे (डीपी) वेल्डिंग तोडून त्यातील ऑईल सांडवून तांब्याच्या तारा चोरीला नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे महावितरणचे नुकसान झाले असून, अज्ञात चोरट्यांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंती गावातील ताटे नावाच्या डीपी क्रमांक ४११३६१३(क्षमता ६३ केव्हीए) तसेच विडणी गावातील शुभांगी अशोक कांबळे यांच्या डीपी क्रमांक ११३३९५४ (क्षमता १०० केव्हीए) या दोन्ही डीपींचे वेल्डिंग तोडून चोरट्यांनी आतील ऑईल सांडविले. त्यानंतर दोन्ही डीपींमधील तांब्याच्या तारा चोरून नेल्या. ही घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

    याप्रकरणी महावितरणचे लाईनमन सुहास दिलीप सोनवणे (वय ४०, रा. बुधवार पेठ, फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अडसूळ करीत आहेत.

No comments