Breaking News

फलटणमध्ये 25 नोव्हेंबरला 15 वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि म.सा.प.पुणेचे नांदी संमेलन

15th Yashwantrao Chavan Marathi Literary Conference and MSP Pune's Nandi Conference to be held in Phaltan on 25th November

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 25 नोव्हेंबर 2026 रोजी प्रतिवर्षीप्रमाणे थोर नेते व साहित्यिक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त 15 वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे नांदी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत महाराजा आयकॉन सभागृह, डी. एड. चौकनजिक, फलटण येथे हे संमेलन पार पडणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी बेडके व म.सा.प. फलटण शाखा अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

    या दोन्ही साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे, पुणे येथील स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख असणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा मा. सौ. प्रियदर्शनी भोसले उपस्थित राहणार आहेत.

    संमेलनाच्या उद्घाटन सत्रात पुस्तक व चित्र प्रदर्शन उद्घाटन, स्थानिक लेखक सुरेश शिंदे, डॉ.महेश बर्वेे, सौ. श्रद्धा वेलणकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी येथील लेखिका स्व. सौ. सुलेखा सुरेश शिंदे यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता पुरस्कार धुमाळवाडी येथील समाजसेविका सौ.शोभाताई कांबळे यांना देण्यात येणार आहे. तसेच सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी वर्षानिमित्त म.सा.प. फलटण शाखेने आयोजित केलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात येणार आहे. यानंतरच्या दुसर्‍या सत्रात दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ या विषयावर प्रा. अरुण घोडके (ईश्‍वरपूर) यांचे व्याख्या, प्रा. रविंद्र कोकरे आणि प्रा. हिम्मत पाटील यांचे कथाकथन होणार असून, स्थानिक लेखकांचा सत्कारही करण्यात येणार आहे, अशी माहिती म.सा.प. फलटणचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे व कार्यवाह अमर शेंडे यांनी दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या मुख्य आयोजनातून तसेच समर्थ युवा फाऊंडेशन - पुणे, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांच्या सहसंयोजनातून जानेवारी 2027 मध्ये शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या आमंत्रणासाठी राज्यात विविध ठिकाणी ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ या उप्रकमांतर्गत साहित्य संमेलनांचे आयोजन होत असून यंदाचे हे 15 वे यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलन यांच नांदी संमेलनाच्या अंतर्गत पार पडत आहे. राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचे संमेलन छोटेखानी स्वरुपात संपन्न होत असल्याचेही आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले.

    फलटणमधील म.सा.प. सभासद आणि साहित्यिक, लेखक, कवी, वाचक आणि साहित्यप्रेमींसाठी हे संमेलन साहित्यिक विचारांची देवाणघेवाण आणि स्थानिक साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या संमेलनास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments