Breaking News

मंचावर प्रतिभेचा झंकार, रंगभूमीवर सर्जनशीलतेचा आविष्कार!; मुधोजीत युवा स्पर्धकांच्या कलाविष्काराने ४६ वा मध्यवर्ती युवा महोत्सव रंगला

The sound of talent on stage, the discovery of creativity on stage!; The 46th Central Youth Festival was filled with the artistic display of talented young contestants

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ९ ऑक्टोबर : आत्मविश्वासाने भरलेले चेहरे, जिंकण्याची जिद्द, कलेचे सादरीकरण आणि आपल्या प्रतिभेची छाप उमटविण्याची धडपड... अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान युवा स्पर्धकांनी विविध कला प्रकारांत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात सुरू असलेल्या या महोत्सवाने परिसराला कला, संस्कृती आणि युवा ऊर्जेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

    महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लोकसंगीत वाद्यवृंद, मूकनाट्य, एकपात्री अभिनय आणि भित्तिचित्रणाने स्पर्धकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. विविध महाविद्यालयांतून आलेल्या युवा कलाकारांनी संगीत, अभिनय आणि दृश्यकलेच्या माध्यमातून आपली स्वतंत्र शैली सादर केली.
सुरांनी, तालांनी आणि लोककलेने रंगला दुसरा दिवस ७ ऑक्टोबरला एकल लोकवाद्य वादन, भारतीय समूहगीत आणि लोककला या प्रमुख स्पर्धांनी वातावरण भारावून गेले. त्याचबरोबर एकपात्री अभिनय, एकांकिका, इंग्रजी व मराठी वक्तृत्व, नाट्यसंगीत, शास्त्रीय तालवाद्य, सुगम गायन, वृंदगायन, नक्कल, लघुपट, कातरकाम, मेहंदी, रंगचत्रण, हिंदी वक्तृत्व, वादविवाद आणि स्थळ छायाचित्रण अशा विविध स्पर्धांमध्ये युवा स्पर्धकांनी आपल्या कलात्मक आणि बौद्धिक क्षमतेचे दर्शन घडविले.

नृत्य, संगीत आणि सर्जनशीलतेचा तिसऱ्या दिवशी उत्कर्ष ८ ऑक्टोबरला महोत्सवाने आणखी व्यापक कलावैविध्य अनुभवले. पाश्चिमात्य एकल वादन, पाश्चिमात्य समूहगीत आणि लोकनृत्य यांनी मुख्य मंचावर रंगत आणली. त्याचबरोबर एकांकिका, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय वाद्य, पाश्चिमात्य एकल गायन आणि शास्त्रीय गायन या स्पर्धांमधून युवा स्पर्धकांनी आपली कलात्मक तयारी आणि सादरीकरणातील कसब दाखविले.

बौद्धिक व सर्जनशील क्षेत्रातही युवा स्पर्धकांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. प्रश्नमंजुषा, रांगोळी, मातीकाम, स्थळचित्रण, सर्जनशील रचनाकृती आणि पथनाट्य या स्पर्धांनी महोत्सवाच्या वैविध्यात भर घातली. संगीत आणि नृत्याबरोबरच कल्पकता, निरीक्षणशक्ती, विचारक्षमता आणि सामाजिक आशय व्यक्त करण्याची युवा स्पर्धकांची क्षमता या माध्यमातून अधोरेखित झाली.

    स्पर्धेपेक्षा अनुभव महत्त्वाचा

    या तीन दिवसांत प्रत्येक स्पर्धकासाठी मंच हा केवळ जिंकण्याचा नव्हे, तर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा, आत्मविश्वास वाढविण्याचा आणि कलागुणांना नवी दिशा देण्याचा अनुभव ठरला. एका बाजूला शास्त्रीय आणि लोककलांचे सादरीकरण, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक संगीत, लघुपट, छायाचित्रण, सर्जनशील रचनाकृती आणि पथनाट्य अशा विविध माध्यमांतून युवा प्रतिभेने आपली व्याप्ती दाखवून दिली.

    यशामागे विद्यापीठ आणि महाविद्यालयाची समन्वयपूर्ण मेहनत

    या भव्य युवा महोत्सवाच्या यशामागे शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षाचे मार्गदर्शन, नियोजन आणि समन्वय तसेच मुधोजी महाविद्यालयाच्या संपूर्ण टीमचे अथक परिश्रम महत्त्वपूर्ण ठरत आहेत. स्पर्धकांचे स्वागत, नोंदणी, स्पर्धांचे नियोजन, विविध कला प्रकारांसाठी आवश्यक व्यवस्था, तांत्रिक समन्वय, वेळेचे काटेकोर नियोजन आणि स्पर्धकांना आवश्यक सहकार्य या प्रत्येक स्तरावर विद्यापीठ आणि महाविद्यालयाची टीम सातत्याने कार्यरत आहे.

    युवा स्पर्धकांच्या प्रतिभेला व्यासपीठ देत हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास कक्ष, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आयोजन समिती, स्वयंसेवक आणि संपूर्ण महाविद्यालयीन टीम एकजुटीने परिश्रम घेत असून, त्यांच्या या सामूहिक योगदानामुळे फलटणमध्ये रंगलेला ४६ वा मध्यवर्ती युवा महोत्सव युवा प्रतिभेचा अविस्मरणीय उत्सव ठरत आहे.

No comments