सरसकट पीक पंचनामे करून भरघोस मदत द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ९ ऑक्टोबर : फलटण तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी शेतकऱ्यांना अद्याप प्रत्यक्ष दिलासा मिळालेला नाही. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने तालुक्यातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सरसकट पीक पंचनामे करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने ९ ऑक्टोबर रोजी फलटणचे तहसीलदार अभिजित जाधव यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, फलटण तालुक्यात पेरणीनंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, कांदा आणि ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये पिके वरून हिरवी दिसत असली, तरी जमिनीतील ओलावा संपल्याने आणि पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी, पिकांमध्ये दाणे भरण्याची आणि अपेक्षित उत्पन्न देण्याची क्षमता राहिलेली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
तालुक्यात सरासरी ७० टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे केवळ काही निवडक गावांमध्ये पंचनामे करून चालणार नाही, तर प्रत्येक गावात आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. हिरवी दिसणारी, मात्र पाण्याअभावी नुकसान झालेली पिकेही पंचनाम्यात समाविष्ट करावीत, असे संघटनेने स्पष्ट केले.
संघटनेच्या आठ प्रमुख मागण्या
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, शेतसारा आणि कृषी पंपांचे वीजबिल माफ करावे, तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे मासिक वेतन तसेच माजी आमदार व खासदारांचे पेन्शन बंद करून हा निधी शेतकऱ्यांच्या दुष्काळ निवारण योजनांसाठी वापरण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करावी, सिंचन व जलसंधारणाचे दीर्घकालीन नियोजन करावे, तसेच मोबाईल ॲपद्वारे नोंदविलेली पीकपाणी सातबारा उताऱ्यावर दिसत नसल्याची समस्या दूर करून संबंधित नोंदी ४८ तासांच्या आत सातबारा उताऱ्यावर दर्शवाव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
शासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने सरसकट पीक पंचनामे करावेत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, शहराध्यक्ष विक्रम पवार, किसन शिंदे, बाबा कोकरे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments