परंपरेचा अभिमान जपा, आधुनिक सर्जनशीलतेतून जगासमोर मांडा! - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे युवा कलावंतांना आवाहन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.10 :आपल्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करत आधुनिक सर्जनशीलतेच्या माध्यमातून त्या जगासमोर प्रभावीपणे मांडल्या पाहिजेत, असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपल्या संस्कृतीची ओळख आणि परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्यांनी मांडला. फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची आणि विविध कलाप्रकारांमधून स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. या संधीचा उपयोग करताना विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक मुळांशी असलेली नाळ जपावी. त्याचबरोबर बदलत्या काळानुसार नवनवीन कल्पना, आधुनिक तंत्र आणि सर्जनशील अभिव्यक्ती यांची सांगड घालून आपल्या कलेला व्यापक व्यासपीठ मिळवून द्यावे, असा संदेश श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या यजमानपदाखाली ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कलांच्या विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. विविध महाविद्यालयांतील युवा कलावंतांच्या सहभागामुळे महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
समारोप सोहळ्याला शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर. व्ही. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. एस. जी. घाणे, विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुरेखा अडके, जिल्हा समन्वयक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवातून युवा कलाकारांनी केवळ स्पर्धांमध्ये यश मिळविण्यापुरते मर्यादित न राहता आपल्या कलेतून समाज, संस्कृती आणि परंपरांचे प्रतिबिंब उमटवावे, हा विचार अधोरेखित झाला. परंपरेचा वारसा आणि आधुनिक सर्जनशीलता यांचा संगम साधत नव्या पिढीने भारतीय कलासंस्कृती जगभर पोहोचवावी, हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षीय मनोगताचा महत्त्वपूर्ण संदेश ठरला.

No comments