Breaking News

बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून जनजागृती

Person dies in accident while crossing highway at Barad; Phaltan Rural Police creates awareness

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ११ ऑक्टोबर : फलटण तालुक्यातील बरड येथे आळंदी-पंढरपूर महामार्ग ओलांडताना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सुरक्षित मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले.

    फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरड येथे शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आळंदी-पंढरपूर महामार्ग ओलांडत असताना एका व्यक्तीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला.

    या दुर्दैवी घटनेची दखल घेत फलटण ग्रामीण पोलिसांच्या वतीने रविवारी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान महामार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी उपलब्ध असलेल्या भुयारी मार्गाचा (बोगद्याचा) तसेच सर्व्हिस रोडचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. याबाबत जनजागृती करणारे बॅनरही लावण्यात आले.

    सुरक्षित मार्गांचा वापर करा; पोलिसांचे आवाहन

    महामार्ग ओलांडताना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडू नये. त्याऐवजी उपलब्ध असलेल्या सुरक्षित मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी केले आहे.

No comments