भूत काढतो म्हणून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; फलटणमध्ये तरुणावर पोक्सो - जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ७ ऑक्टोबर २०२६ - अल्पवयीन मुलीच्या अंगात भूत शिरल्याची भीती दाखवून, जादूटोणा केल्याचा बनाव करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फलटण येथील २५ वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभनाना मदने, वय २५, रा. बुधवार पेठ, फलटण, असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताची पीडित मुलीच्या कुटुंबासोबत ओळख होती. त्याने मुलीच्या अंगात भूत शिरल्याचे सांगून जादूटोणा करून ते काढल्याचा बनाव केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर जुलै ते ऑगस्ट या कालावधीत मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने एका जुन्या घरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बदनामीची भीती आणि संशयित आरोपीच्या धाकामुळे पीडित अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments