Breaking News

डॉ.मॅक्सिन बर्नसन ‘दीपशिखा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित’; माजी विद्यार्थिनींकडून ९१ हजारांचा कृतज्ञता निधी

Dr. Maxine Bernson honored with Deepshikha Lifetime Achievement Award; Alumni donate Rs. 91,000 to charity

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) : दि. 8  : मातृभाषेतून शिक्षण, वंचित व ग्रामीण मुलांचा सर्वांगीण विकास आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, भाषाभ्यासक व समाजसुधारक डॉ. मॅक्सिन बर्नसन यांना त्यांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त ‘दीपशिखा जीवनगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून कृतज्ञतापूर्वक सन्मानित करण्यात आले.

    सावली शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा यांच्या वतीने बेंगळुरू येथे हा सन्मान सोहळा पार पडला. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा तथा डॉ. बर्नसन यांच्या माजी विद्यार्थिनी आयु. रेश्मा शीतल मोरे यांनी स्वतः बेंगळुरू येथे जाऊन आपल्या गुरुवर्य तथा लाडक्या ‘मॅक्सिन मावशीं’ यांचा सन्मान केला.

    अमेरिकेत जन्मलेल्या डॉ. बर्नसन यांनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानत मराठी भाषा, शिक्षण आणि ग्रामीण समाजजीवनाशी अतूट नाते निर्माण केले. मातृभाषेतून शिक्षण हा त्यांच्या शैक्षणिक कार्याचा केंद्रबिंदू राहिला. परदेशी व्यक्तींना मराठी शिकविण्यासाठी दर्जेदार अभ्यासक्रम व पुस्तके तयार करण्याबरोबरच मराठी भाषेला व्यापक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

    प्राथमिक शिक्षण अधिक अर्थपूर्ण, आनंददायी आणि परिणामकारक करण्यासाठी त्यांनी प्रगत शिक्षण संस्था आणि कमला निंबकर बालभवन यांच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली. वंचित, उपेक्षित आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये भाषा, वाचन आणि लेखनाची गोडी निर्माण करून प्राथमिक शिक्षणाला नवी दिशा देण्याचे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरत आहे.

    ‘मातृभाषेतून शिक्षणाचा ध्यास आणि वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारी एक दीपशिखा’ अशा भावनेतून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

    या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने सावली शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था आणि काही माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून ९१ हजार रुपयांचा कृतज्ञता निधीही डॉ. मॅक्सिन बर्नसन यांना सुपूर्त करण्यात आला. त्यांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याप्रती व्यक्त करण्यात आलेल्या ऋणनिर्देशाचे हे प्रतीक ठरले.

    डॉ. बर्नसन यांच्या शिक्षणातील प्रयोगशील दृष्टिकोन, मातृभाषेविषयीची आस्था, मुलांप्रती असलेली तळमळ आणि निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव करणारा हा सन्मान सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करताना, त्यांनी पेटवलेली शिक्षणाची आणि माणूसपणाची दीपशिखा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments