Breaking News

दुष्काळी परिस्थिती आणि अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

Decision not to celebrate the birthday of Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar in the backdrop of drought situation and Ajitdada's demise

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. 8 - सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचा ९ ऑक्टोबर रोजी असणारा वाढदिवस यंदा कोणत्याही स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन, सातारा जिल्ह्यासह फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली आचारसंहिता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी आमदार दीपक चव्हाण यांनी याबाबत विशेष आवाहन केले आहे.

    श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी फलटण शहर व तालुक्यात विविध सामाजिक, सेवाभावी आणि विधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच फलटण येथील सरोज व्हिला येथे आयोजित शुभचिंतन सोहळ्यास त्यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी, नागरिक, हितचिंतक, कार्यकर्ते आणि शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा देतात.

    मात्र, यंदा राज्यातील दुःखद परिस्थिती, दुष्काळाचे सावट आणि आचारसंहितेची पार्श्वभूमी लक्षात घेता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि शुभेच्छुकांनी वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे स्वागत, सत्कार, शुभेच्छा समारंभ अथवा अन्य कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आवाहन दीपक चव्हाण यांनी केले आहे.

    परिस्थितीचे भान राखून घेतलेल्या या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करताना चव्हाण यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरील प्रेम, स्नेह आणि शुभेच्छांचे मोल कायम असल्याचे नमूद केले. मात्र, यंदा वैयक्तिक शुभेच्छांपेक्षा परिस्थितीची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    या निर्णयाचा आदर करून सर्व कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांनी सहकार्य करावे, अशी विनंती दीपक चव्हाण, माजी आमदार, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ यांनी केली आहे.

No comments